उदगीरातील 'श्रीलंका' धडकनाळ-बोरगावला पडला पुन्हा पुराचा वेढा, ग्रामस्थांनी रात्र जागून काढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:02 IST2025-08-28T18:01:46+5:302025-08-28T18:02:02+5:30
उदगीर तालुक्यातील लातूर रोड वगळता सर्व मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन बंद पडले आहेत.

उदगीरातील 'श्रीलंका' धडकनाळ-बोरगावला पडला पुन्हा पुराचा वेढा, ग्रामस्थांनी रात्र जागून काढली
- व्ही. एस. कुलकर्णी
उदगीर ( लातूर) : बुधवारी रात्री पासून सुरू झालेल्या धुवांधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील 'श्रीलंका' म्हणून ओळख असलेल्या धडकनाळ आणि बोरगाव या दोन्ही गावांना पुराचा वेढा पडला आहे. जोरदार पाऊस सुरूच राहून पाण्याची पातळी वाढत गेल्याने बुधवारची रात्र गावकर्यांनी जागून काढली. दरम्यान, उदगीर तालुक्यातील लातूर रोड वगळता सर्व मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन बंद पडले आहेत.
दहा दिवसातच या गावांना दुसऱ्यांदा महापुराचा मोठा फटका बसला आहे. लेंडी नदीची उपनदी असलेल्या नदीला महापूर आल्याने या नदीचे पाणी धडकनाळ आणि बोरगावात शिरले. उदगीर देगलूर बोरगाव रस्त्यावरील पुलावरुन पाणी जात असल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. सकाळपासून पुराचे पाणी वाढत आहे. त्यामुळे गावातील घरांमध्ये पाणी शिरत आहे. गावकर्यांनी वेळीच जनावरे व घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविले आहे.
१० दिवसात दुसऱ्यांदा शिरले गावात पाणी!
१८ ऑगस्टला पुराचा महाप्रलय धडकनाळ बोरगावात आला होता. या प्रलयात गावासह गावातील पशुधन, शेतीचे मोठे नुकसान झाले होते. पुराने शेतीतील फक्त खडे शिल्लक ठेवले होते. पिके व पशुधन पुरात वाहून गेले होते. ४०० हेक्टर जमिनीचे नुकसान व २२० पशुधन वाहून गेले होते. या गावांचे जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसर्यांदा गावात पुराचे पाणी शिरल्याने गावच्या पुनर्वसनाची मागणी जोर धरत आहे.
माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केली पाहणी
माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी लंडनचा दौरा करून परत येताच प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूरग्रस्त धडकनाळ -बोरगाव भागातील नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून गावांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर मार्ग वगळता तालुक्यातील सर्व मार्ग बंद!
गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे एकमेव लातूर मार्ग सुरू होता. सर्व मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे तालुक्यातील सर्व मार्ग बंद होते.
तिरु, देवर्जनसह सर्व तलाव ओहरफ्लो!
तालुक्यातील तिरु व देवर्जन हे दोन मोठे मध्यम प्रकल्प असून, हे दोन्ही प्रकल्प पाण्याने ओसंडून वाहत आहे. शिवाय तालुक्यातील लघु व साठवण तलावही ओसंडून वाहत आहेत. तिरुचे सर्व दरवाजे खुले करण्यात आल्यामुळे तिरु नदीला महापूर आला आहे. तालुक्यातील गावाजवळून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना पूर येवून सर्वच पुलावरून पाणी जात असल्यामुळे तालुक्यातील सर्व मार्ग गुरुवारी बंद होते. गुरुवारी दिवसभर पाण्याची संततधार सुरूच होती. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही.