क्रीडा मंत्र्यांचा ताफा अडविला, आमदाराला दाखविले काळे झेंडे; लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक
By आशपाक पठाण | Updated: October 23, 2023 19:55 IST2023-10-23T19:53:34+5:302023-10-23T19:55:44+5:30
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलकांनी उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा सोमवारी अडविला.

क्रीडा मंत्र्यांचा ताफा अडविला, आमदाराला दाखविले काळे झेंडे; लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक
बोरगाव काळे (लातूर) : मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलकांनी उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा सोमवारी अडविला. तर लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. मराठा आरक्षणाची मागणी सकल मराठा समाजाकडून वाढत आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आंदोलक तीव्र झाले आहेत. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा सोमवारी वाढवणा पाटी, चिमाचीवाडी येथे नियोजित दौरा होता. त्यानुसार ते सोमवारी दुपारी वाढवणा पाटी येथे आले असता मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यावेळी क्रीडा मंत्री बनसोडे यांनी गाडीतून उतरून निवेदन स्विकारले. आरक्षणासंदर्भात राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुढील दौरा रद्द करून उदगीरकडे रवाना झाले.
बोरगाव, एकुर्का येथील युवकांची घोषणाबाजी...
लातूर तालुक्यातील निवळी येथे विलास साखर कारखान्याचा सोमवारी गळीत हंगामाचा प्रारंभ होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार अमित देशमुख आले होते. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. तसेच मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. याप्रसंगी एकुरगा, बोरगाव काळे येथील मराठा समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मुरूड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले. मांजरा पट्ट्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पक्षाचे पुढारी, आमदार, खासदार, मंत्री यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक होत आहेत.