लातूर - अहमदपूरदरम्यान महामार्ग कामाची कासवगती; वाहनधारकांसह स्थानिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:57 IST2022-06-20T15:56:00+5:302022-06-20T15:57:49+5:30
काही ठिकाणी महामार्गाचे काम झाले आहे, तर काही ठिकाणी एकेरी बाजूचे काम झाले आहे.

लातूर - अहमदपूरदरम्यान महामार्ग कामाची कासवगती; वाहनधारकांसह स्थानिक त्रस्त
लातूर : जिल्ह्यातून नागपूर - रत्नागिरी, जहिराबाद - परभणी, टेंभुर्णी - लातूर हे महामार्ग जातात. यातील जहिराबाद ते परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असून, नागपूर - रत्नागिरी मार्गाचे काम लातूर ते अहमदपूर दरम्यान, कासवगतीने सुरु आहे. परिणामी, वाहनधारकांसह स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
काही ठिकाणी महामार्गाचे काम झाले आहे, तर काही ठिकाणी एकेरी बाजूचे काम झाले आहे. या मार्गावर काेळपा - भातांगळी पाटी, ममदापूर, आष्टाेमाेड, घरणी, घरणी नदी, लातूर राेड, चाकूर शहर, चापाेली, शिरुर ताजबंद येथील उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. गत वर्षभरापासून या उड्डापुलांची कामे सुरु आहेत. चाकूर, शिरुर ताजबंद आणि अहमदपूर शहरासाठी बाह्यवळण रस्ता (रिंगराेड) मंजूर असून, याचेही काम कासवगतीने सुरु आहे.
पूर्ण झालेल्या मार्गावर वाहतूक...
लातूर जिल्ह्यातील नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर औसा ते लातूर दरम्यानचा मार्ग सध्याला पूर्णत्व:स आला आहे. याही मार्गावरील पुलाची कामे सुरु आहेत. तर दुभाजकाचे काम हाेत आहे. शिवाय, राजीव गांधी चाैक ते गरुड चाैक दरम्यानच्या एका बाजुचे काम सध्याला सुरु आहे. जहिराबाद ते परभणी हा मार्ग पूर्ण झाल्याने वाहतूक सुरु झाली आहे. काही ठिकाणी याही मार्गावरील कामे राहिली आहेत.