पेरणीपूर्व सोयाबीन उगवण क्षमतेची चाचणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:14+5:302021-05-07T04:20:14+5:30
सोयाबीन काढणी नंतर मळणी करताना मळणी यंत्राची गती ४०० आरपीएम पेक्षा जास्त असल्यास, सोयाबीन हे कडक उन्हात वाळवल्यास, साठवणुकीच्या ...

पेरणीपूर्व सोयाबीन उगवण क्षमतेची चाचणी करावी
सोयाबीन काढणी नंतर मळणी करताना मळणी यंत्राची गती ४०० आरपीएम पेक्षा जास्त असल्यास, सोयाबीन हे कडक उन्हात वाळवल्यास, साठवणुकीच्या ठिकाणी आर्द्रता, तापमान योग्य नसल्यास, ५ पेक्षा अधिक पोत्यांची थप्पी लावल्यास, १ वर्षांहून ही जास्त जुने बियाणे असल्यास, हाताळते वेळी बियांवर बिया घासल्यास अंकुरांना ईजा होऊन बियाणांची उगवण क्षमता कमी होते. त्यामुळे बियाणे घरचे असो की विकतचे पेरणी पूर्व उगवण क्षमता तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खरीप हंगाम २०२१-२०२२ मध्ये स्वतःकडील सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वी उगवण क्षमतेची चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेरणी करते वेळी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबाबत शेतकऱ्यांना अंदाज येऊ शकतो. शेतकऱ्यांनी घरच्या घरीच उगवण क्षमतेची चाचणी करावी व चाचणी पूर्वी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी स्वतः कडे असलेल्या सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडी कचरा, माती,खडे, दाळ व चूर, लहान व खरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणी नंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कमी उगवण क्षमतेमुळे उत्पन्नात घट...
तेलबिया असलेले सोयाबीन उगवणीच्या बाबतीत अतिशय संवेदनशील समजले जाते. अगदी बियाणे हाताळणीत ही थोडी फार चूक किंवा दुर्लक्ष झाले तरी त्याची उगवण क्षमता कमी होते. बियाणांची उगवण क्षमता कमी असली की रोपांची संख्या कमी होऊन उत्पन्नात घट कमालीची येते. हे टाळण्यासाठी योग्य बियाणाची निवड व पडताळणी करावी, असे आवाहन कृषी सहाय्यक पी. बी. गिरी यांनी केले आहे.