लागवडीच्या ८२ टक्के क्षेत्रावर सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:32+5:302021-07-15T04:15:32+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुका सोयाबीन उत्पादक असल्याने तालुक्यात दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढत होत आहे. यंदा मृगात पाऊस ...

लागवडीच्या ८२ टक्के क्षेत्रावर सोयाबीन
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुका सोयाबीन उत्पादक असल्याने तालुक्यात दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढत होत आहे. यंदा मृगात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून, एकूण लागवडीच्या ८२ टक्के क्षेत्रावर सोयाबीन आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३४ हजार ५०० हेक्टर जमीन असली तरी त्यापैकी लागवडीयोग्य जमीन २९ हजार ७०० हेक्टर आहे. त्यापैकी २८ हजार ५०० हेक्टरवर खरिपातील विविध पिके घेतली जातात. इतर पिकांचा सोयाबीनसारखा उतारा पदरी पडत नाही. त्यामुळे दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. यंदा मृग नक्षत्रात पावसाने दोनदा दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ केला. बहुतांश शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल असल्याने या पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लागवडीच्या २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. खरिपात ८२ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक आहे.
पेरणीस वेग आला...
तालुक्यात मृगात ९४ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला प्रारंभ केला होता. पहिल्या टप्प्यात २६ हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु, मध्यंतरी १५ दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पेरण्यांचा वेग मंदावला होता. आता केवळ हजार हेक्टरवर पेरा शिल्लक आहे. त्यामुळे पेरण्या अंतिम टप्प्यात असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
भीज पावसाने पिके तरारली...
तालुक्यात अद्याप मोठा पाऊस झाला नसला तरी मागील आठवड्यापासून भीज पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक तरारले आहे. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तृणनाशक फवारणीकडे कल...
तालुक्यात भीज पाऊस झाला आहे. त्यामुळे तण वाढत आहे. खुरपणीसाठी मजूर मिळत नाहीत. शिवाय फवारणीपेक्षा खुरपणीचा खर्च अधिक होत असल्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीनच्या पिकात तण वाढू नये म्हणून तणनाशक फवारणी करण्यावर भर देत असल्याचे चंद्रकांत दावणगावे, खंडू सूर्यवंशी, लखन कांबळे यांनी सांगितले.