कधी पैशांसाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:09+5:302021-08-25T04:25:09+5:30
भानामती हे निव्वळ ढोंग असून सौम्य मानसिक आजार अथवा गंभीर मानसिक आजार असल्याचे लातूर जिल्ह्यात घडलेल्या भानामतीच्या प्रकरणांतून पुढे ...

कधी पैशांसाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?
भानामती हे निव्वळ ढोंग असून सौम्य मानसिक आजार अथवा गंभीर मानसिक आजार असल्याचे लातूर जिल्ह्यात घडलेल्या भानामतीच्या प्रकरणांतून पुढे आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्ह्यात अशी ५७५ प्रकरणे हाताळली आहेत. त्यातून ही वास्तवता समोर आली आहे. भानामती, करणी, जादूटोणा या सर्व बाबी फसवणुकीच्या असल्याचे ‘अंनिस’ने सिद्ध केले आहे. म्हणूनच त्यांनी करणी, भानामती करून दाखवा आणि २१ लाख रुपये मिळवा, असे आव्हान केले आहे. मात्र हे आव्हान स्वीकारायला कोणीही पुढे येत नाही.
२०१३ मध्ये झाला कायदा.....
जादूटोणा, भानामती, करणी यांसह अन्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबींवर आळा घालण्यासाठी २०१३ मध्ये कायदा झाला. एकूण १२ कलमांचा हा कायदा आहे. भूत उतरविणे, साप चावल्यानंतर उपचार न करता मंत्रातून विष उतरविणे, आर्थिक प्राप्तीसाठी एक प्रकारची दहशत निर्माण करणे यावर आळा घालण्यासाठी बारा कलमांचा हा कायदा आहे. तरीही राज्यांमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना घडत आहेत.
भानामती करून दाखवा; २१ लाख रुपये मिळवा....
पैशांचा पाऊस पडून दाखवा की करणी, भानामती आणि कोणताही जादूटोणा करून दाखवा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याला २१ लाख रुपये द्यायला तयार आहे. हे गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून ‘अंनिस’ने दिलेले आव्हान का स्वीकारले जात नाही? असा सवाल माधव बावगे यांनी उपस्थित केला आहे. पैशांचा पाऊस नाही की करणी, भानामती नाही. ढोंग, सौम्य मानसिक आजार आणि अतिमानसिक आजाराचा हा प्रकार आहे.
कोट...,
करणी, भानामती आणि जादूटोणा करणाऱ्यांवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे. या कायद्यानुसार घडलेल्या घटनांबाबत गुन्हे दाखल करून कारवाई केल्यास असे प्रकार घडणार नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती या अनुषंगाने काम करीत आहे. लातूर जिल्ह्यात पाच आणि राज्यात ५५० गुन्हे ‘अंनिस’च्या पाठपुराव्यामुळे दाखल झाले आहेत.
माधव बावगे
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राज्य प्रधान सचिव