अहमदपूरात ४५ दिवसाआड येते नळाला पाणी; सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी दोन नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:07 IST2021-01-27T19:02:31+5:302021-01-27T19:07:28+5:30
जलवाहिनी व अन्य कामांचा दर्जा कमी असून सातत्याने गळती लागत आहे.

अहमदपूरात ४५ दिवसाआड येते नळाला पाणी; सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी दोन नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन
अहमदपूर (जि. लातूर) : शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी करीत येथील दोघा नगरसेवकांनी नांदेड रोडवरील पाण्याच्या टाकीवर जाऊन मंगळवारी शोले स्टाईल आंदोलन केले.
अहमदपूर शहरात ४५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. घनकचरा व्यवस्थापनात अडचणी आहेत. काही घंटागाड्या बंद आहेत. संबंधित गुत्तेदार वेळेवर काम करीत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी तयार झाली. पण शहरात लिंबोटी पाणी येण्यासाठी १९ दिवसांचा कालावधी लागला. जलवाहिनी व अन्य कामांचा दर्जा कमी असून सातत्याने गळती लागत आहे. विविध प्रभागातील काँक्रिटचे रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्यात आली. पण ते खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत, अशा समस्या उपस्थित करुन नगरसेवक संदीप चौधरी व रवी महाजन यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार २६ जानेवारी रोजी या नगरसेवकांनी नांदेड रोडवरील १५ मीटर उंचीच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
मंगळवारी सकाळी ९ वा. नगरसेवक संदीप चौधरी व रवि महाजन यांनी आंदोलन सुरू केले. तेव्हा मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, सतीश बिलापट्टे, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोकॉ. रामदास आलापुरे यांनी धाव घेऊन त्यांची समजूत काढली. संबंधित काम आठ दिवसांत पूर्ण करण्यासंबंधीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नगरसेवकांनी आपले आंदोलन मागे घेतले.