पिता-पुत्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:52 IST2025-11-06T12:51:25+5:302025-11-06T12:52:08+5:30
आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन त्यांच्यावर दुचाकी घालून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

पिता-पुत्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण उघड
अहमदपूर (जि.लातूर) : शेती पुन्हा नावावर करीत नसल्याचा राग मनात धरून तालुक्यातील रुद्धा येथील दोघांनी शेतातील आखाड्यावर झोपलेल्या पिता-पुत्रावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे बुधवारी उघडकीस आले आहे. खून करून अपघात झाल्याचा आरोपींनी बनाव रचला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपीस अटक केली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले, तालुक्यातील रुद्धा येथील शिवराज निवृत्ती सुरनर (७०) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर (१९) हे दोघे सोमवारी रात्री शेतातील आखाड्यावर झोपले होते. तेव्हा त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला ही धक्कादायक माहिती मिळताच तिने पोलिसांना कळविली. त्यानुसार, अहमदपूरचे पोनि.विनोद मेत्रेवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स्थागुशाची तीन आणि अहमदपूर पोलिस ठाण्याच्या दोन अशा एकूण पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली. डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पोलिस पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल सीडीआर विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत गुन्ह्यातील नरसिंग भाऊराव शिंदे (६०), केरबा नरसिंग शिंदे (२१, दोघे रा.रुद्धा, हमु.करेवाडी, ता.लोहा, जि.नांदेड) या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
खुनाचे कारण उलगडले...
शिवराज सुरनर यांच्या नावे शेती करून दिली होती. मात्र, नंतर ती शेती स्वतःच्या नावे करून देण्याची मागणी आरोपींनी केली. याच रागातून आरोपींनी खुनाचा कट रचला. सोमवारी रात्री आरोपींनी झोपडीजवळ दबा धरून बसून बाप-लेकावर हल्ला केला. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन त्यांच्यावर दुचाकी घालून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
१२ तासांत आरोपी जरबंद
पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. तपास पथकात पोनि.विनोद मेत्रेवार, सपोनि.संतोष केदासे, पोउपनि.स्मिता जाधव, स्थागुशाचे पोनि.सुधाकर बावकर, पोउपनि.रवि बुरकुळे, आनंद श्रीमंगल, तानाजी आरदवाड, हरी कांबळवाड, विशाल सारोळे, मारोती शिंदे, बाळू पांचाळ, हनुमंत आरदवाड, वैजनाथ दिंडगे, बबन चपडे यांचा समावेश होता.