धक्कादायक! पोलिस शिपायाची राहत्या घरात आत्महत्या, चार दिवसानंतर झाला उलगडा
By राजकुमार जोंधळे | Updated: March 10, 2023 19:20 IST2023-03-10T19:19:54+5:302023-03-10T19:20:27+5:30
पत्नी माहेरी तर इतर नातेवाईक बाहेरगावी गेल्याने घरी कोणीच नव्हते

धक्कादायक! पोलिस शिपायाची राहत्या घरात आत्महत्या, चार दिवसानंतर झाला उलगडा
लातूर : जिल्हा पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने ही घटना चार दिवसानंतर उघडकीस आली. तानाजी लहू करमाळे (वय ३६) असे मयत पाेलिस शिपायाचे नाव आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील नांदेड राेडवरील सिद्धार्थ साेसायटीत वास्तव्याला असलेल्या तानाजी लहू करमाळे हे सध्याला लातूर जिल्हा पाेलिस दलात कार्यरत हाेते. दरम्यान, घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले हाेते. तर पत्नी माहेरी गेली हाेती. घरात फक्त एकटी वृद्ध महिला हाेती. घरात काेणीच नसल्याने त्यांनी घरातील छताच्या सिलिंग फॅनला नाॅयलनच्या दाेरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी मृतदेह फुगल्याने दुर्गंधी सुटली हाेती. याबाबत दार ताेडून पाहिले असता, तानाजी करमाळे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी गळफास रविवारी घेतला असवा, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत विलास श्रावण करमाळे (वय ४९ रा. गातेगाव ता. लातूर) यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मित मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास पाेलिस हवालदार जी. एस. ढगे करीत आहेत.