लातूर-बीडमध्ये 'शक्तिपीठ' आरेखन जैसे थे; शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, मोजणीस कडाडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:49 IST2026-04-06T13:12:21+5:302026-04-06T13:49:38+5:30
"आमची जमीन, आमचा आधार"; रेणापूर आणि अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो शेतकरी एकवटले, कायदेशीर लढाईची तयारी.

लातूर-बीडमध्ये 'शक्तिपीठ' आरेखन जैसे थे; शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, मोजणीस कडाडून विरोध
रेणापूर : बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'शक्तिपीठ महामार्गा'बाबत राज्य शासनाने १ एप्रिल २०२६ रोजी घेतलेला निर्णय लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला आहे. इतर जिल्ह्यांतील महामार्गाचे आरेखन बदलले असताना, लातूर आणि बीडमधील आरेखन मात्र 'जैसे थे' ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाविरोधात रेणापूर तालुक्यातील मोटेगाव फाटा येथे रविवारी दोन्ही जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली, ज्यामध्ये शासनाशी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला.
गेल्या अडीच वर्षांपासून या महामार्गाला विरोध होत आहे. शासनाने अलीकडेच एक नवीन निर्णय पारित केला, ज्यानुसार काही जिल्ह्यांतील महामार्गाच्या नकाशात बदल करून दिलासा दिला आहे. मात्र, लातूर आणि बीड जिल्ह्यातील सुपीक जमिनीतूनच हा मार्ग जाणार असल्याने येथील शेतकऱ्यांनी सरकारचा दुजाभाव खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
बैठकीतील ५ महत्त्वाचे निर्णय..!
मोटेगाव फाटा येथील बैठकीत शेतकरी कृती समितीने आक्रमक पावले उचलण्याचे ठरवले आहे. जोपर्यंत सुपीक भागातून जाणारा महामार्ग पूर्णतः रद्द होत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शेतात पाऊल टाकू दिले जाणार नाही आणि 'संयुक्त मोजणी' प्रक्रियेला कडाडून विरोध केला जाईल. जिल्हा आणि तालुका पातळीवर मोठ्या ताकदीने आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले जाईल. समाजातील विविध घटक आणि राजकीय प्रतिनिधींच्या भेटी घेऊन होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली जाईल. रस्त्यावरील लढाईसोबतच कायदेशीर बाबी तपासून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
...या गावातील शेतकरी एकवटले
या बैठकीला रेणापूर आणि अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ, भोकरंबा, मोटेगाव, चाडगाव, मोरवड, नांदगाव, भारज, गीत्ता यांसह अनेक बाधित गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते. आमची सुपीक जमीन आमचा आधार आहे, ती कोणत्याही महामार्गासाठी बळी देऊ देणार नाही, असा एकमुखी सूर यावेळी उमटला.
मोटेगाव फाटा येथे झाली बैठक
मोटेगाव झाटा येथे झालेल्या बैठकीला शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीचे समन्वयक गजेंद्र येळकर, बालाजी हाके, सुशील कुमार शिंदे, रामेश्वर चव्हाण, विठ्ठल नाना देशमुख यांच्यासह नीळकंठ भिसे, साहेबराव पाटील, दशरथ सोमवंशी, सुरज पाटील, दीपक माने, शैलेश खुरसाले, जयकिशन मेटे, बालाजी चव्हाण, परमेश्वर देशमुख, शिवराज पाटील आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.