लातुरात अवैध होर्डिंग, बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण; सात गुन्हे दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: October 16, 2022 19:27 IST2022-10-16T19:26:58+5:302022-10-16T19:27:29+5:30
लातुरात अवैध होर्डिंग, बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातुरात अवैध होर्डिंग, बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण; सात गुन्हे दाखल
लातूर : उच्च न्यायालयाने अवैध होर्डिंग्ज लावण्याबाबत मनाई केली असतानाही काही व्यक्तींकडून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन हाेत आहे. लातूर शहरात चाैकाचाैकासह विविध ठिकाणी सर्रासपणे अवैध होर्डिंग्ज, बॅनर आणि पोस्टर लावले जात असल्याचे आढळून आले आहे. याबाबत लातूर महानगरपालिका प्रशासन आणि पाेलिसांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पाेलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान, अवैध हाेर्डिंग्ज, बॅनर जप्त करण्यात आले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहरातील पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी, अंमलदार त्याचबराेबर लातूर महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने गेल्या दाेन दिवसांपासून लातुरात विशेष माेहीम राबवून विनापरवाना, अवैध बॅनर, होर्डिंग्ज लावून शहराच्या सार्वजनिक विद्रुपीकरणास कारणीभूत ठरलेल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी अवैध होर्डिंग, बॅनर लावणाऱ्यांवर लातुरातील पोलीस एमआयडीसी, शिवाजीनगर आणि विवेकानंद चौक पाेलीस ठाण्यात महाराष्ट्र सार्वजनिक संपत्ती विद्रुपीकरण कायदा १९९५ नुसार एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लातूर महापालिकेच्या झोन पथकाने अवैध होर्डिंग्ज जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध होर्डिंग्ज, बॅनर हटविण्याची कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार असून, रात्रीच्या सुमारास होर्डिंग लावले जात असल्याचे आढळून आले आहेत. असे आढळून आल्यास लातुरातील अवैध होर्डिंग्ज आणि पोस्टर, बॅनर जप्त करून कारवाई केली जाणार आहे.