कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढले; औषधांच्या विक्रीतही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:09+5:302021-06-24T04:15:09+5:30
लातूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची होती. त्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात बाधित रुग्णांचा उच्चांक झाला होता. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढले; औषधांच्या विक्रीतही वाढ
लातूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची होती. त्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात बाधित रुग्णांचा उच्चांक झाला होता. आता लाट ओसरत असली तरी डिप्रेशन वाढलेलेच आहे. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, संवाद वाढवून सकारात्मक विचारातून डिप्रेशनवर मात करा, असा सल्ला त्यांना मिळत आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तिपटीने रुग्ण वाढले होते. अनेकांच्या कुटुंबात सर्वच सदस्य बाधित झाले होते. उपचारासाठी ताणाताण झाली होती. मानसिक धक्के बसल्याने अनेकजण यातून अद्याप सावरलेले नाहीत. मानसोपचार तज्ज्ञांकडे येत असलेल्या रुग्णसंख्येवरून हे दिसून येते. शिवाय, लॉकडाऊनमुळे घरातच कोंडून राहिल्याने चिडचिडेपणा वाढलेला आहे. व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक ताणही वाढला आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला होता, त्यांच्यात डिप्रेशन असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा रुग्णांनी कुटुंब, मित्रांसोबत संवाद वाढवून सकारात्मक विचार करण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देत आहेत.
मानसिक तणाव टाळण्यासाठी हे करा
मानसिक तणाव टाळण्यासाठी कुटुंब, मित्रांसोबत संवाद वाढवून मन हलके करण्याची गरज आहे. संवाद वाढल्यावरच मन हलके होते. मोबाईल, स्क्रीनचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे.
कोरोना टाईम अर्थात कोरोनाच्या अनुषंगाने येणाऱ्या न्यूज पाहणे कमी करावे. कोरोनातून मुक्त झालेल्या नातेवाईकांसोबत सकारात्मक विचार करावा. शिवाय, बरे झालेल्या रुग्णांनी आपला अनुभव सकारात्मक दृष्टीने शेअर करावा.
व्हॅक्सिनेशन कोरोनावर प्रभावी मात्रा आहे. या संदर्भात असलेले गैरसमज दूर करून जनजागृती करत आपलाही संवाद हेल्दी करावा. जेणेकरून तणाव वाढणार नाही.
नेहमी सकस आहार, सकस विचार, सकस संवाद, व्यायाम, प्राणायाम करून तणावमुक्त जीवन कसे जगता येईल, या अनुषंगाने विचार करण्याची गरज आहे. नकारात्मक विचाराला छेद द्यायला हवा.
या कारणांमुळे वाढले डिप्रेशन
दुसऱ्या लाटेत अनेकांच्या कुटुंबात सर्वच सदस्यांना लागण झाली. त्यामुळे ताणतणाव वाढला. उपचार घेण्यासाठी धावपळ झाली. यामुळे बसलेल्या धक्क्यातून अधिक सावरता आले नाही.
लस घेतली नाही. त्यामुळेच आपल्याला कोरोना झाला होता. लस घेतली असती तर कोरोना झाला नसता किंवा सौम्य लक्षणे आढळली असती. यामुळेही वाढतोय तणाव.
औषध विक्री दुपटीने वाढली
मानसिक रुग्ण क्वचित प्रमाणात आढळत असत. परंतु, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे औषध विक्रीत वाढ झालेली आहे. दुसऱ्या लाटेत तर दुप्पट वाढ झाली आहे. - औषध विक्रेता
ज्यांना कोरोना होऊन गेला, अशा रुग्णांमध्ये डिप्रेशन आहे. ते सल्ला घेण्यासाठी येत आहेत. त्यांना सकारात्मक संवाद वाढविण्याचाच आम्ही सल्ला देतो. लॉकडाऊन, घरातील बाधित रुग्ण, आर्थिक अडचण यामुळे ताणतणाव वाढलेला दिसतो. - डॉ. आशिष चेपुरे, मानसोपचार तज्ज्ञ
स्क्रीन टाईम वाढलेला आहे. मुलं अडॅक्ट होत आहेत. अभ्यासावरचेही लक्ष कमी झालेले आहे. एकटेपणामुळे ही लक्षणे आले आहेत. महिलांमध्येही कामाचा ताण आहे, आर्थिक समस्या आहेत. त्यांच्यामध्ये संवादाची गरज आहे. - डॉ. अपूर्वा कर्मवीर, बाल मानसतज्ज्ञ