अहमदपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन अनेकांच्या जीवावर उठले आहे. मागील दीड वर्षापासून अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. हातावर पोट असणारे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. परराज्यातून केवळ रोजगारासाठी अहमदपूर शहरात आलेले दगडीकाम करणारे कारागीर मूर्तिकलेचा व्यवसाय थंडावल्याने अडचणीत सापडले आहेत.
ग्रामीण भागात जाते, पाटा, खलबत्ता, वरवंटा मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे या कारागिरांना रोजगार मिळत होता. मध्य प्रदेश खांडवा जिल्ह्यातील बोरनीगाव येथून अहमदपुरात येऊन व्यवसाय करणारे काही मूर्तिकार लॉकडाऊननंतर अडचणीत सापडले आहेत. मिक्सर, ग्राइंडरच्या या जमान्यात आधीच हा व्यवसाय अडचणीत आला आहे. जुन्या काळी सर्रास वापरले जाणारे जाते, पाटा, खलबत्ता आदी पारंपरिक साधनांना घरघर लागली. आधीच घरघर लागलेल्या जात्यांना आता कोरोनामुळे पुरता ब्रेक लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या कारागिरांना जगणे मुश्कील झाले आहे.
दहा ते बारा हजार रुपयांना जाते, मूर्ती.....
मूर्ती, जाते, पाटा, वरवंटा, खलबत्ता हे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा कठीण काळा दगड आणावा लागतो. याच्या खाणी मोठ्या कौशल्याने व बारकाईने हेराच्या लागतात. साधारण ३५ हजार रुपये प्रतिटिप्पर या दराने परभणी, देऊळगावराजा, बुलडाणा येथून दगड खरेदी करावा लागतो. दिवसाला साधारण एक कारागीर दोन किंवा तीन पाटे किंवा खलबत्ते तयार करू शकतो. एका कारागिराला मूर्ती तयार करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. साधारण ही मूर्ती
दहा ते बारा हजार रुपयांना विकली जाते. तसेच मूर्तीच्या आकारानुसार विकली जाते. मूर्ती साधारण २०० ते ३०० रुपयांना मोठ्या आकाराचे जाते विकले जाते. पाटाही जवळपास त्याच किमतीत विकला जातो.
.....................
आम्ही दिवसभर पावसात, उन्हातान्हात छन्नी-हातोड्यांनी ओबडधोबड दगडाला आकार देत असतो. दिवसाला एक व्यक्ती दोन वस्तू बनवू शकतो. मागील दीड वर्षापासून आमचा व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मूर्ती खरेदी करण्यासाठी कोणीच येत नसल्याने आता खायचे काय? हा प्रश्न उभा राहिला आहे.
- जगदीश चव्हाण, कारागीर (मध्य प्रदेश, खांडवा), अहमदपूर