राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच- संजय शेटे

By आशपाक पठाण | Updated: January 7, 2024 19:24 IST2024-01-07T19:23:09+5:302024-01-07T19:24:03+5:30

लातूर जिल्ह्यात पक्ष बळकट करणार

Sanjay Shete's press conferencesays most NCP activists are with Sharad Pawar | राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच- संजय शेटे

राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच- संजय शेटे

लातूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी त्यात काहीच तथ्य नाही. कारण अद्यापही ९९ टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सोबतच आहेत. शरद पवार एक व्यक्ती नसून विचार आहे, असे राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी रविवारी पत्रपरिषदेत सांगितले.

यावेळी शेटे म्हणाले, लातूर जिल्ह्यात आजपावेतो राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे मजबूत होऊ शकली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. यापुढील काळात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पार्टीचे संघटन वाढविण्यासाठी आपण जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन सर्वतोपरी उपाययोजना करणार आहोत.

जिल्ह्यातील कार्यकर्ते अजूनही पूर्ण ताकदीनिशी शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. लवकरच जिल्ह्याचा दौरा करून पार्टीची जिल्हा कार्यकारिणी घोषित करणार आहे. येणाऱ्या नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद - पंचायत समिती , विधानसभा निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण शक्तीनिशी लढवणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि अहमदपूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपण विक्रमी मतांनी निवडून आणणारच असा दावाही संजय शेटे यांनी केला.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील, रशीद शेख, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, भरत सूर्यवंशी, रेखाताई कदम,निशांत वाघमारे, स्नेहा मोटे, बक्तावर बागवान, सुधीर साळुंखे, परमेश्वर पवार, बस्वराज रेकुळगे, आर.झेड. हाश्मी, इरफान शेख, , सय्यद फेरोज, उमाकांत धावारे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Sanjay Shete's press conferencesays most NCP activists are with Sharad Pawar