पंप मालकाचे धाडस! १०० किमी पाठलाग करून टँकरमधून पेट्रोल चोरणारी टोळी पकडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:54 IST2025-11-07T18:54:19+5:302025-11-07T18:54:41+5:30
टँकर चालक आणि पंप व्यवस्थापक या दोघांच्या संगनमताने सुरू होता गोरखधंदा

पंप मालकाचे धाडस! १०० किमी पाठलाग करून टँकरमधून पेट्रोल चोरणारी टोळी पकडली
- महेबूब बक्षी
औसा (लातूर): मागील अनेक वर्षांपासून महामार्गावर खुलेआमपणे चालणाऱ्या पेट्रोल-डिझेल चोरीच्या गोरखधंद्याचा काल पर्दाफाश झाला आहे. मुखेड तालुक्यातील एका पेट्रोल पंप मालकाच्या पतीने तब्बल १०० किलोमीटर टँकरचा पाठलाग करून, येल्लोरी पाटीवर टँकरमधील पेट्रोल-डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या धाडसी कारवाईमुळे तेल तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सोलापूर येथील धर्मेंद्र ट्रान्स्पोर्टचा एक टँकर (क्रं. एम एच १३ सीयू २४३५) मुखेड तालुक्यातील मालक्ष्मी पेट्रोल पंपासाठी पेट्रोल घेऊन सोलापूरहून औसा मार्गे निघाला होता. टँकर चालक टवपिटू जगन्नाथ वर्मा आणि मुखेड येथील पंप व्यवस्थापक ज्ञानेश्वर मारोती नरवाडे यांनी संगनमत केले. टँकर चालक वर्मा आणि व्यवस्थापक नरवाडे यांनी विश्वासाने सोपवलेल्या टँकरमधील पेट्रोलची चोरी करण्यासाठी औसा येथील येल्लोरी पाटीवर टँकर थांबवले. याच दरम्यान, पंप मालकाचे पती भगवानराव पाटील यांनी संशयावरून डेपोपासूनच टँकरचा पाठलाग सुरू केला होता. १०० किलोमीटरपर्यंत टँकरचा पाठलाग केल्यानंतर त्यांना येल्लोरी पाटीवर टँकरमध्ये गेल्याचे दिसले. पाटील आत केले असतं टँकरमधून अंदाजे ६० लिटर पेट्रोल (किंमत सुमारे ६३०० रुपये) काढून घेताना टोळीला रंगेहाथ पकडले. पाटील यांनी या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले आणि व्यवस्थापक नरवाडे याला पकडून भादा पोलीस ठाण्यात आणले.
खुलेआम चालणाऱ्या गोरखधंद्यावर प्रश्नचिन्ह
वर्षानुवर्षे महामार्गालगतच्या पाटीवर हा अवैध धंदा बिनधास्तपणे सुरू होता. 'हा गोरखधंदा सर्वांच्या सहकार्याने चालत असून, जागोजागी टोळ्या सक्रिय असल्याने बिनधास्तपणे पंप मालकाची लूट केली जात आहे,' अशी खळबळजनक माहिती भगवानराव पाटील यांनी दिली. ट्रान्स्पोर्ट चालकाच्या फिर्यादीवरून भादा पोलिसांनी टँकर चालक वर्मा, पंप व्यवस्थापक नरवाडे आणि इतर तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांनुसार (BNS ३१६, (३)३(५) नुसार) गुन्हा दाखल केला आहे. फौजदार पुरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तीन तास रस्त्यावर होता धोकादायक टँकर
चोरी पकडल्यानंतर चालक व इतर आरोपी फरार झाले. भरलेला टँकर रस्त्याच्या कडेला लावून ते पसार झाले. तब्बल तीन ते साडेतीन तास टँकर रस्त्यावर उभा होता, ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. सपोनि महावीर जाधव यांनी तातडीने ट्रान्स्पोर्ट मालकाशी संपर्क साधून टँकर सुरक्षितरित्या औशात आणले.