आरटीई प्रवेश प्रक्रिया; लातूर जिल्ह्यात २०० शाळांमध्ये १६६९ जागा, अर्जासाठी १७ मार्चची डेडलाईन
By संदीप शिंदे | Updated: March 1, 2023 18:04 IST2023-03-01T18:04:11+5:302023-03-01T18:04:31+5:30
आरटीईची प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होत असते. यंदा या प्रक्रियेस उशिर झाला

आरटीई प्रवेश प्रक्रिया; लातूर जिल्ह्यात २०० शाळांमध्ये १६६९ जागा, अर्जासाठी १७ मार्चची डेडलाईन
लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी जिल्ह्यातील २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नाेंदणी केली असून, १ हजार ६६९ जागांवर मोफत प्रवेश होणार आहेत. दरम्यान, ऑनलाईन अर्ज करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली असून, १७ मार्च अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
आरटीईची प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होत असते. यंदा या प्रक्रियेस उशिर झाला असून, सुरुवातीला शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारपासून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली. १७ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार असून, त्यानंतर राज्यस्तरावर सोडत काढली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविण्यात येणार असून, कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
शिक्षण विभागाकडे २०० शाळांची नोंदणी...
आरटीईसाठी २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. यामध्ये अहमदपूर १४, औसा १७, चाकूर ११, देवणी ०८, जळकोट ०४, लातूर ८७, निलंगा २४, रेणापूर ०७, शिरुर अनंतपाळ ०२ तर उदगीर तालुक्यातील २६ शाळांचा समावेश आहे. दरम्यान, या शाळांमध्ये एकूण १६६९ जागा असून, नवीन शैक्षणिक वर्षापर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक...
बालकाचा जन्मदाखला, आधार कार्ड, सामाजिक आरक्षणाचा दाखला, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, बालकाचा फोटो, रहिवासी पुरावा, गॅस कार्ड, बँकेचे पासबुक, घरभाडे करार आदी कागदपत्रे लागतात. अर्ज भरण्यास बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सुरुवात झाली असून, मुलांचे अर्ज भरण्यासाठी पालकांनी संगणक केंद्रांवर गर्दी केली होती.
पंचायत समितीत कागदपत्रांची पडताळणी...
आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यस्तरावर सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती येथे कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतरच शाळेत प्रवेश निश्चित होईल. दहा तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.