उदगीर बसस्थानकाच्या छताला पावसाळ्यात लागते गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:21+5:302021-06-26T04:15:21+5:30
उदगीर : शहरातील नांदेड-बिदर मार्गालगत ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, सध्या ती मोडकळीस ...

उदगीर बसस्थानकाच्या छताला पावसाळ्यात लागते गळती
उदगीर : शहरातील नांदेड-बिदर मार्गालगत ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, सध्या ती मोडकळीस आली आहे. अशा परिस्थितीतील इमारतीत दररोज शेकडो प्रवासी वावरत आहेत. या इमारतीला जागोजागी तडे गेले असून, छताचा गिलावाही गळून पडला आहे. पावसाळ्यात तर या इमारतीला गळती लागते.
उदगीर येथील बसस्थानकाची इमारत जीर्ण झाल्यामुळे मध्यंतरीच्या काळात ही इमारत पाडून येथे नव्याने आधुनिक सुविधांनीयुक्त असे बसस्थानक उभारण्यास दोन- अडीच वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. या बसस्थानकाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. तसेच संबंधित गुत्तेदारामार्फत ही इमारत पाडण्यासाठी पर्यायी बसस्थानकाची निर्मितीही करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे इमारत पाडण्याच्या कामास सुुरुवात झाली नाही. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
उदगीर बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र कचरा पडला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. प्रवासी त्रस्त झाले आहेत. तसेच बसस्थानक परिसरात डांबरीकरण नसल्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच पावसाचे पाणी साचत आहे. स्वच्छतागृह परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे बसस्थानकाची ही जुनी इमारत लवकरात लवकर पाडून नवीन इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
मोठ्या बाजारपेठेचे ठिकाण...
उदगीर शहर हे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर आहे. या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तेलंगणा, कर्नाटक राज्यातील प्रवासी दररोज मोठ्या संख्येने ये-जा करीत असतात. यातून महामंडळाला मोठे उत्पन्न मिळते. लातूरनंतर जिल्ह्यातील उदगीर हे महामंडळास मोठे उत्पन्न देणारे आगार म्हणून ओळखले जाते. येथील स्थानकाची इमारत लवकरात- लवकर पाडून सोयी-सुविधांनीयुक्त असे स्थानक उभारावे, अशी मागणी होत आहे.