रहिवास एका प्रभागात, मतदार यादीत नाव दुसऱ्या प्रभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:00+5:302020-12-12T04:36:00+5:30

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. २०११ ची जनगणना आधारभूत मानून लोकसंख्येनुसार आरक्षण ...

Resident in one ward, name in voter list in another ward | रहिवास एका प्रभागात, मतदार यादीत नाव दुसऱ्या प्रभागात

रहिवास एका प्रभागात, मतदार यादीत नाव दुसऱ्या प्रभागात

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. २०११ ची जनगणना आधारभूत मानून लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रभाग २ व ३ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. प्रभाग रचनेनुसार प्रारूप मतदार यादी तयार होणे अपेक्षित असताना तलाठ्याने स्थानिक राजकीय मंडळींच्या सोयीप्रमाणे प्रभागनिहाय मतदार यादी तयार केल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेनुसार मतदार ज्या प्रभागात वास्तव्यास आहेत, त्या प्रभागात त्यांची मतदार म्हणून नोंद झाली नाही. साधारणतः ६५४ मतदारांसाठी एक प्रतिनिधी निवडून द्यावयाचा आहे. त्याप्रमाणे तीन प्रतिनिधी निवडून द्यावयाच्या प्रभागांमध्ये कमाल १ हजार ९६२ आणि दोन प्रतिनिधी निवडून द्यावयाच्या प्रभागांमध्ये कमाल १ हजार ३०८ मतदार असणे गरजेचे आहे; परंतु अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभाग-२ मध्ये तीन प्रतिनिधी निवडून द्यावयाचे असताना तेथे २ हजार २४२ एवढ्या मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तसेच प्रभाग-३ मध्ये दोन प्रतिनिधी निवडून द्यावयाचे असताना तिथे १ हजार ६५२ एवढ्या मतदारांची नोंद करण्यात आली आहे. याउलट सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग-६ मध्ये तीन उमेदवार निवडून द्यावयाचे असतानाही केवळ १ हजार ५४२ मतदारांची नोंद तिथे करण्यात आली आहे. मतदारांच्या मतदार यादीतील प्रभाग बदलामुळे प्रभाग २ व ३ येथील सर्वसाधारण लोकसंख्येचे व मतदारांचे प्रमाण जाणीवपूर्वक वाढविण्यात आले आहे. तसेच या आरक्षित प्रभागातील मतदारांचे विभाजन करून त्या प्रभाग-२ व ३ मध्ये अधिकच्या ६५० मतदारांची नोंदही केलेली आहे.

तलाठ्याने मनमानी केली आहे. तसेच प्रभाग रचनेप्रमाणे मतदार याद्या तयार न केल्यामुळे प्रत्येक प्रभागातील मतदारांची सरमिसळ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील ५०० ते ६०० मतदारांची नोंद प्रभाग रचनेनुसार त्यांच्या प्रभागात झालेली नाही.

त्यावर औराद शहाजानीतील प्रदीप पाटील, विश्वास थेटे, राजा पाटील, अमाेल ढाेरसिंगे, विशाल ओहाेळ, सुधाकर शेटगार आदी नागरिकांनी तहसीलदारांकडे आक्षेप नोंदविला आहे.

सोमवारी अंतिम मतदारयादी...

याप्रकरणी चाैकशी करून तलाठ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी घेऊन तहसीलदारांनी ग्रामस्थांची हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे, असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे साेमवारी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे औरादकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औराद शहाजानी येथील सरपंच पदाला विशेष महत्त्व आहे. या निवडणुकीसाठी सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे चुरस निर्माण हाेणार आहे.

Web Title: Resident in one ward, name in voter list in another ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.