उदगीरात एका महिलेवर पाच वर्षांपासून बलात्कार; आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 14:24 IST2019-12-07T14:24:12+5:302019-12-07T14:24:22+5:30
उदगीर येथील आरोपी अक्रम मिर्झा याने फिर्यादी विवाहितेच्या पतीसोबत मैत्री वाढविली.

उदगीरात एका महिलेवर पाच वर्षांपासून बलात्कार; आरोपीस अटक
उदगीर (जि़ लातूर) : येथील एका विवाहितेस तुझे अश्लिल छायाचित्रे व व्हीडीओ सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देत एकाने पाच वर्षांपासून बलात्कार केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी पिडित विवाहितेच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी हा उदगीर पालिकेतील नगरसेविकेचा पती असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, उदगीर येथील आरोपी अक्रम मिर्झा याने फिर्यादी विवाहितेच्या पतीसोबत मैत्री वाढविली. त्यानंतर सदरील विवाहितेचे अश्लिल फोटो व व्हीडीओ सोशल मिडियावर टाकतो, अशी धमकी देत डिसेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत सातत्याने बलात्कार केला़ दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मी तुला सोडणार नाही़ तुझी बदनामी करतो तसेच यासंदर्भात कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. अखेर पिडित विवाहितेने उदगीर शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने शुक्रवारी रात्री उशिरा आरोपी अक्रम मिर्झा याच्याविरुध्द कलम ३७६ (२) (न), ५०४, ५०६ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे़ पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, पोनि़ महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि़ व्ही.आय. येडके करीत आहेत.