वादळी वाऱ्यासह पावसाने झाेडपले; पाच गावांत सर्वत्र अंधारच अंधार..!
By राजकुमार जोंधळे | Updated: May 14, 2025 04:09 IST2025-05-14T04:09:44+5:302025-05-14T04:09:44+5:30
हलगरा उपकेंद्रात बिघाड : दुरुस्तीचे काम सुरु...

वादळी वाऱ्यासह पावसाने झाेडपले; पाच गावांत सर्वत्र अंधारच अंधार..!
राजकुमार जाेंधळे. औराद शहाजानी (जि. लातूर) : जिल्ह्यातील हलगरा (ता. निलंगा) परिसरातील गावांना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झाेपडून काढले. परिणामी, हलगरा येथील वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.
मंगळवारी सायंकाळी हलगरा परिसरात दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली. यामध्ये हलगरा येथील वीज उपकेंद्रातील मुख्य रोहित्रामधून अचानक धूर निघाल्याने ते बंदा झाले. यामुळे या केंद्रातून परिसरातील गावांना पुरवठा हाेणार वीज पुरवठा बंद झाला. हलगरा, तगरखेडा, हालसी, तांबरवाडी आणि हनुमंतवाडी या गावांचा वीजपुरवठा सायंकाळी पाच ते रात्री उशिरापर्यंत बंद राहिल्याने ही गावे अंधारात बुडाली. उन्हाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची माेठ्या प्रमाणावर गैरसाेय झाली. हलगरा परिसरात या गावांचा पाणीपुरवठाही बंद झाला आहे. गत काही दिवस झाले सायंकाळच्या सुमारास अचानक हलके वारे सुटत आहे. अजून-मधून हलक्या पावसाच्या सरीही काेसळत आहेत. अशा वाऱ्यातच वीजपुरवठा तासन् तास खंडित होत आहे. मंगळवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न...
दरम्यान, नागरिकांनी औराद येथील सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी कोणाचाही फोन उचलला नाही, असे नागरिकांनी सांगितले. औराद येथे प्रभारी अभियंता पद दिले असून, नागरिकांना सुविधा वेळेवर मिळत नाहीत. पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी ग्रामस्थांतून हाेत आहे. हलगरा येथील उपकेंद्रातील रोहित्रात तांत्रिक बिघाड झाला आहे. ताे दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असे महावितरणचे उपविभागीय अभियंता सावळे म्हणाले.