रायवाडी शिवारात जुगारावर छापा; सहा जुगारी पाेलिसांच्या जाळ्यात !
By राजकुमार जोंधळे | Updated: March 13, 2023 18:34 IST2023-03-13T18:34:17+5:302023-03-13T18:34:31+5:30
यावेळी पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे

रायवाडी शिवारात जुगारावर छापा; सहा जुगारी पाेलिसांच्या जाळ्यात !
लातूर : तालुक्यातील रायवाडी शिवारातील एका शेडमध्ये सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. यावेळी सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख ३९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूरनजीक हरंगुळ ते रायवाडी पाणंद रस्त्यावर एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये काही लाेक विजेच्या उजेडात बसून पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना मिळाली. या माहातीच्या आधारे पथकाने छापा मारला. यावेळी काही लाेक तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. जुगार खेळताना सहा जणांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पाच दुचाकी, जुगाराचे साहित्य, राेख रक्कम असा एकूण ५ लाख ३९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थागुशाचे सहायक पाेलिस निरीक्षक आलेवार, पाेलिस उपनिरीक्षक जाधव, पाेलिस हवालदार नवनाथ हसबे, माेहन सुरवसे, तुराब पठाण, रवि कानगुले, माधव बिलापट्टे यांच्या पथकाने केली.