लातूर, उदगीर येथे पोलिसांच्या विशेष पथकाच्या धाडी; २१ लाखाचा गुटखा, दारूसाठा जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: December 30, 2022 17:46 IST2022-12-30T17:45:35+5:302022-12-30T17:46:46+5:30
दारू, बंदी असलेला गुटखा व सुगंधित पानमसाला आणि त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन जप्त

लातूर, उदगीर येथे पोलिसांच्या विशेष पथकाच्या धाडी; २१ लाखाचा गुटखा, दारूसाठा जप्त
लातूर : चोरट्याचा मार्गाने विक्रीसाठी गुटख्याचा बेकायदा साठा करून ठेवणाऱ्या एकाला विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेत, धाड मारली. यावेळी वाहनासह तबबल २१ लाखाचा अवैध दारू आणि गुटखा हाती लागला आहे. याबाबत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांच्या विविध पथकाकडून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेवून, धाडी टाकण्याची मोहीम आखण्यात आली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लातुरातील विराट नगर, खाडगाव रोड परिसरात प्रतिबंधित गुटका आणि सुगंधित तंबाखूची चोरट्या विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी एकाला ताब्यात घेत चौकशी केली. त्यांच्याकडून बंदी असलेला गुटखा व सुगंधित पानमसाला आणि त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे पिकअप वाहन असा एकूण १८ लाख ३३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अमलदार अंगद कोतवाड यांच्या तक्रारीवरून फिरोज उर्फ आदम आयुब उमाटे (वय ३०, रा. विराट नगर, खाडगाव रोड, लातूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उदगीर परिसरात कारसह १६ बॉक्स दारूसाठा पकडला...
उदगीर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून चोरट्या मार्गाने विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी दारूची वाहतूक करणाऱ्या राहुल लक्ष्मण कांबळे (वय २९, रा. लोहारा, ता. उदगीर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १६ बॉक्स देशी दारू आणि वाहतुकीसाठीची कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई...
ही कारवाई कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे ,राजेश कंचे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, सचिन मुंडे, बालाजी जाधव, रवी कानगुले यांच्या पथकाने केली.