लातूर महापालिकेत 'बोगस' लिपिक नियुक्तीचे रॅकेट; आयुक्तांच्या बनावट सही-शिक्क्याने 'ऑर्डर'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:00 IST2025-12-09T15:59:02+5:302025-12-09T16:00:07+5:30
या गंभीर प्रकारानंतर लातूर मनपा प्रशासनाने तत्काळ पावले उचलली; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

लातूर महापालिकेत 'बोगस' लिपिक नियुक्तीचे रॅकेट; आयुक्तांच्या बनावट सही-शिक्क्याने 'ऑर्डर'!
लातूर : लातूर महानगरपालिकेत लिपिक पदाच्या सहा नियुक्त्या बोगस पद्धतीने दिल्याचा खळबळजनक प्रकार माहिती अधिकार कायद्यांतर्गत उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या सहा उमेदवारांना ही नोकरीची ऑर्डर मिळाली, त्यांनीच सत्यता पडताळण्यासाठी आरटीआयमध्ये अर्ज केल्यानंतर हा मोठा घोटाळा प्रशासनाच्या निदर्शनास आला.
शुभम बाळासाहेब गरड, ज्ञानेश्वरी रवी गरड, मारुती भगवान शिवणे, आदित्य बंकट भिंगे, सोमनाथ लक्ष्मण पांचाळ आणि बापूराव कोंडिराम हुडे या सहा व्यक्तींना लातूर महापालिकेत लिपिकपदाची ऑर्डर मिळाली होती. संशय आल्याने याच लोकांनी महापालिकेकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करून त्यांना मिळालेली 'नोकरीची ऑर्डर' आणि 'वैद्यकीय प्रमाणपत्र' खरे आहे की खोटे, याची खात्री मागवली.
आरटीआयच्या उत्तरात महापालिकेने स्पष्ट केले की, अनुक्रमांक एक ते चारमधील माहिती मनपाकडे उपलब्ध नाही. त्याचा अर्थ या नियुक्त्या मनपाच्या नोंदीनुसार झालेल्या नाहीत. दरम्यान, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तापडे व आस्थापना विभागप्रमुख अभिमन्यू पाटील यांच्या चौकशीत, ही ऑर्डर मनपा आयुक्त मानसी मीना यांच्या बोगस सही आणि शिक्क्याचा वापर करून दिली गेल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस तक्रार दाखल, चौकशी सुरू
या गंभीर प्रकारानंतर लातूर मनपा प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तापडे आणि आस्थापना विभागप्रमुख अभिमन्यू पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय, आयुक्त मानसी मीना यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तापडे आणि पाटील यांची नियुक्ती केली आहे.
बोगस ऑडरमागे कोणाचा हात..!
बोगस ऑर्डर देण्यामागे कोणत्या व्यक्तींचा किंवा रॅकेटचा हात आहे, याचा तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलीसांनी हे प्रकरण तपासवार ठेवले आहे.
नियुक्ती आदेश गेले नाहीत
आयुक्त श्रीमती मानसी यांच्या बोगस सही-शिक्याचा आधारे लिपिक पदाच्या सहा जणांना बोगस ऑर्डर दिल्याचे आरटीआयमुळे समोर आले आहे. त्यांना ऑर्डर कोणी दिल्या, हे संबंधितांनाच माहीत असेल. याबाबत मनपा प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस तपासातून सत्य समोर येईल. आम्ही चौकशी केली आहे. आमच्या कार्यालयातून हे नियुक्ती आदेश गेले नाहीत.
- अभिमन्यू पाटील, आस्थापना विभागप्रमुख, लातूर मनपा