'पुष्पा' स्टाइलने गांजा तस्करी; विशाखापट्टणमहून टँकरमध्ये आलेल्या ३ क्विंटल गांजाचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 19:19 IST2024-10-04T19:18:57+5:302024-10-04T19:19:21+5:30
उदगीर ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत एक कोटींचा मुद्देमाल जप्त

'पुष्पा' स्टाइलने गांजा तस्करी; विशाखापट्टणमहून टँकरमध्ये आलेल्या ३ क्विंटल गांजाचा साठा जप्त
उदगीर : एका टँकरमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी उदगीर तालुक्यातील हाकनाकवाडी शिवारात टँकरची झडती घेतली असता ३ क्विंटल २ किलो गांजा आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पंचनाम्यात तीन क्विंटल गांज्यासह टँकर व इतर एकूण १ कोटी ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पोलिसांना बुधवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करीत २ किलो गांजासह एक कार असा २ लाख ५० हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी अमोल ज्ञानोबा मोरे (रा. वडवळ नागनाथ ता. चाकूर) व एक महिला यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्याने त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले, २ किलो गांजाचे पॉकेट हे नमुना असून, लातूर, नांदेड, नाशिक येथील गांजा विकणाऱ्या लोकांना सॅम्पल दाखवण्यासाठी याचा उपयोग करत होतो. उर्वरित गांजा हा एका टँकरमध्ये टाकून विशाखापट्टणम येथून देगलूरमार्गे उदगीर येथे आणला आहे. रस्त्याने संशय येऊ नये म्हणून तेलाच्या टँकरचा उपयोग करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. यासाठी टँकर चालक अमोल गोरे याच्यासोबत लहू आलुरे, सचिन आलुरे, कैलास बेंडके (सर्व रा. वडवळ नागनाथ ता. चाकूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार हाकनकवाडी शेत शिवारामध्ये एका शाळेच्या पाठीमागे उभा केलेला टँकर क्रमांक (एम.एच ४६ ए.आर. ०६५९) मधून १४ पोते गांजा ३ क्विंटल २ किलो किंमत ७५ लाख व टँकरची किंमत ३२ लाख, २ लाख किंमतीची कार असा एकूण १ कोटी ९ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणात पोलीस निरीक्षक राजकुमार फुलारी, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, गणेश कदम, रवींद्र तारु, परशुराम देवकते, आयुब शेख, माधव केंद्रे, संतोष शिंदे, प्रदीप घोरडे, राहुल नागरगोजे, अंगद कोतवाड, नामदेव चेवले, महबूब सय्यद, भीमाशंकर फुलारी, अभिजीत लोखंडे, राम बनसोडे, निजामुद्दीन मोमीन, तुकाराम कज्जेवाड, अर्जुन तिडोळे, जुल्फेकार लष्करे, संतोष देवडे, गणेश साठे यांनी भूमिका बजावली.