बेलकुंड येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:20+5:302021-01-01T04:14:20+5:30
औसा तालुक्यातील माेठे गाव बेलकुंड आहे. येथे भादा पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकी आहे. गत अनेक वर्षांपासून येथे ...

बेलकुंड येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव लालफितीत
औसा तालुक्यातील माेठे गाव बेलकुंड आहे. येथे भादा पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकी आहे. गत अनेक वर्षांपासून येथे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही या प्रस्तावर ठाेस निर्णय झाला नाही. बेलकुंड येथील पाेलीस चाैकीच्या कार्यक्षेत्रात बेलकूंड, मातोळा, उजनी, एकंबी, टाका आणि परिसरातील गावांचा, वाड्या-वस्त्या यांचा समावेश आहे. जवळपास २५ पेक्षा अधिक गावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी केवळ चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. दिवसेंदिवस गावांचा विस्तार होत असून, लोकसंख्येचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. त्याचबराेबर येथे बँका, टपाल कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालये आहेत. शिवाय, साखर कारखाना असून, बेलकूंड, उजनी, मातोळा, टाका, आशिव येथे आठवडी बाजार भरताे. नागपूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग याच भागातून जाताे. गत काही वर्षात या परिसरात गुन्हेगारीचा टक्का वाढत आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून लुटणे, दरोडा टाकण्याचे प्रयत्न झाले आहेत. आशिव, उजनी गावात माेठ्या चोरीच्या घटना घडल्या असून, याबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांना भादा येथे जावे लागते. हे अंतर जवळपास ४० किलाेमीटरचे आहे. बेलकूंड येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनदरबारी पडून आहे. तो अद्यापही प्रलंबित असून, त्याबाबत पाेलीस प्रशासनाकडूनही पाठपुरावा सुरु आहे, असे भादा पाेलीस ठाण्यातचे सहायक पाेलीस निरीक्षक संदीप भारती म्हणाले.