एक हेक्टर शेतीवर घेतले २५५ टन उसाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST2020-12-12T04:35:58+5:302020-12-12T04:35:58+5:30
हाळी हंडरगुळी : हाळी गावानजीकच्या आनंदवाडी येथील एका शेतकऱ्याने एक हेक्टर जमिनीवर २५५ टन ४२९ किलो उसाचे उत्पादन घेतले ...

एक हेक्टर शेतीवर घेतले २५५ टन उसाचे उत्पादन
हाळी हंडरगुळी : हाळी गावानजीकच्या आनंदवाडी येथील एका शेतकऱ्याने एक हेक्टर जमिनीवर २५५ टन ४२९ किलो उसाचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची परिसरासह तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. ही शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत आहेत.
आनंदवाडी येथील सुनील कुंठे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पाण्याचे स्रोत नसतानाही पारंपरिक पिके घेण्याऐवजी जेमतेम पाण्यावर उसाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ६७१ जातीच्या बेण्याची निवड केली. त्यांनी मशागतीची नवीन पद्धती अवलंबिली. दोन सरीत सात फुटांचे अंतर ठेवले. सरी पद्धतीऐवजी ड्रीपद्वारे उसाला पाणी देऊन पाण्याची बचत केली. वेळेवर खत, औषध, फवारणी, खुरपणी करून कमी खर्चात १२ महिन्यांत विक्रमी एकरी १०२ टन उत्पादन घेतले. त्यांना अडीच एकरमध्ये २५५ टन उसाचे उत्पादन मिळाले आहे.
सध्या हाळी हंडरगुळी परिसरात ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. काही शेतकरी कारखान्याला ऊस पाठवीत आहेत, तर काही शेतकरी गुऱ्हाळाकडे वळले आहेत. हाळी हंडरगुळी परिसरात तिरू प्रकल्प असल्याने परिसरातील चिमाचीवाडी, मोरतळवाडी, आडोळवाडी, सुकणी, आनंदवाडी, वायगाव, कुमठा आदी शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे.
आनंदवाडी येथील शेतकरी सुनील कुंठे यांनी विक्रमी उत्पादन घेतल्याने त्यांची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
-----------------------------