शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:27 IST2024-12-26T17:26:06+5:302024-12-26T17:27:10+5:30
चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील सहल; सोलापूर जिल्ह्यात अपघात

शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले
- हरी मोकाशे
चाकूर (जि. लातूर) : शैक्षणिक सहलीसाठी कोल्हापूरला जाणाऱ्या चाकूर तालुक्यातील शिवणखेड (बु.) येथील विद्यार्थ्यांची खाजगी बस उलटल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वा. च्या सुमारास मंगळवेढा (जि. सोलापूर) नजिक घडली. सुदैवाने ३९ विद्यार्थ्यांसह ७ कर्मचारी बालंबाल बचावले. अपघातातील जखमीवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.
चाकूर तालुक्यातील शिवणखेड (बु.) येथील श्री गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कोल्हापूर, पन्हाळगड, राजवाडा येथे आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी शाळेतील २१ मुले, १८ मुली, चार शिक्षक, दोन शिक्षिका आणि एक शिपाई असे एकूण ४६ जण एका खाजगी बस (एमएच २४, एबी ७२८१) मधून बुधवारी रात्री १० वाजता कोल्हापूरकडे निघाले होते. ही खाजगी बस गुरुवारी पहाटेच्या सुमारास मंगळवेढानजिक पोहोचली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन एका बाजूस उलटली. अपघातात काही मुले, कर्मचारी किरकोळ जखमी झाले. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व विद्यार्थ्यांवर मंगळवेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या बसमधून सर्व विद्यार्थ्यांना लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी करुन उपचार केले. बहुतांश मुलांना थोडासा तर काहींना मुकामार लागल्याने औषधोपचार करुन सायंकाळच्या सुमारास सुटी करण्यात आली.
काळ्याकुट्ट अंधारात जोरदार आरडाओरड..
पहाटेची वेळ असल्याने सर्व मुले झोपेत होती. बस उलटल्याने एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड करण्यास सुरुवात झाली. अंधारामुळे काहीही दिसत नव्हते. चाचपडत काही मुले, शिक्षक बसमधून बाहेर पडले आणि बसमध्ये अडकलेल्या मुलांना सुखरुप बाहेर काढले. यावेळी बस चालकही अडकून पडला होता. त्यालाही शिक्षकांनी बाहेर काढले.
सहकारमंत्र्यांकडून चौकशी...
अपघाताची माहिती मिळताच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विद्यार्थ्यांवर उपचाराबरोबर आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी, अशा सूचना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासनास केल्या.
सर्व मुलांची प्रकृती चांगली...
अपघातातील १५ ते २० मुलांना थोडाफार मार लागल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांचे एक्स- रे काढण्यात आले आहेत. सर्व मुलांची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.
- डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधीक्षक, सर्वोपचार.