मांजरा धरणात पाण्याचा ‘पॉझिटिव्ह’ साठा; उन्हाळ्यात शेतीची तहान भागणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:50 IST2026-04-06T15:45:44+5:302026-04-06T15:50:01+5:30
विशेष म्हणजे उन्हाळी पिकांसाठी पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले असून, कालवा समितीच्या बैठकीत यावर अंतिम मोहोर उमटणार आहे.

मांजरा धरणात पाण्याचा ‘पॉझिटिव्ह’ साठा; उन्हाळ्यात शेतीची तहान भागणार!
लातूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच लातूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरणातून (धनेगाव) दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रकल्पात सध्या १०९ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी ७८ दलघमी पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. विशेष म्हणजे उन्हाळी पिकांसाठी पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले असून, कालवा समितीच्या बैठकीत यावर अंतिम मोहोर उमटणार आहे.
पाटबंधारे विभागाने उन्हाळ्याची गरज लक्षात घेऊन ७८ दलघमी पाण्याचा आराखडा तयार केला आहे. दोन पाळ्या पाणी सोडले जाईल. डाव्या आणि उजव्या कालव्यातून एक रोटेशन प्रत्येकी १० दलघमीचे असेल. दोन्ही कालवे मिळून २० दलघमी पाणी शेतीसाठी एका रोटेशनमध्ये सोडले जाणार आहे.
७८ दलघमी पाण्याचा आराखडा तयार..!
शेतीसाठी (कालवे) : डाव्या आणि उजव्या कालव्यातून ४० दलघमी पाणी सोडले जाईल.
नदीपात्रातील बॅरेजेस : नदीपात्रातून १८ दलघमी पाणी बॅरेजेससाठी प्रवाहित केले जाईल.
बाष्पीभवन व उपसा : वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि उपसा यासाठी २० दलघमी पाणी गृहीत धरण्यात आले आहे.
३००० हेक्टरवरील पिकांना मिळणार जीवदान..!
रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी कमी होती, त्यामुळे केवळ एकच पाळी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठी मागणी नोंदवली आहे.
मांजरा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांतर्गत १२०० लाभार्थी शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली आहे.
या नियोजनामुळे सुमारे ३००० हेक्टरवरील उन्हाळी पिकांना पाणी मिळणार आहे.
उन्हाळी पिकांसाठीचे पहिले रोटेशन पूर्ण झाले असून, उर्वरित दोन रोटेशन एप्रिल आणि मे महिन्यात पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
कालवा समितीच्या निर्णयाकडे लक्ष..!
प्रशासनाने आपले नियोजन तयार केले असले तरी, या प्रस्तावावर कालवा समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील शेती या दोन्ही आघाड्यांवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
एकूण जिवंत साठा : १०९ दलघमी
नियोजित वापर : ७८ दलघमी
लाभार्थी शेतकरी : ११०० ते १२००
सिंचन क्षेत्र : ३००० हेक्टर