उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संदीप कुलकर्णी व नायब तहसीलदार राजाराम खरात हे तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक यंत्रणा राबवीत आहेत. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी १० निवडणूक निर्णय अधिकारी व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ गावांत एकूण ७६ मतदान केंद्रे असून ४२७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १०० ईव्हीएम मशीनचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण झाले आहे.
सोमवारी (दि. ११) सर्वांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात मशीन सील करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. व्ही. काडवादे, व्ही. के. हांडे, पी. एस. शिंदे, आय. जे. गोलंदाज, जी. ए. त्रिपती, बी. ए. चिंचोले, व्ही. बी. धुळे; तर राखीव म्हणून डी. एम. घंटेवाड, आर. पी. भंडारे, ए. झेड. उस्ताद यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. व्ही. सूर्यवंशी, आर. डी. वारकड, एस. एस. लाखाडे, आर. एस. शिवपुरे, व्ही. एस. सुवर्णकार, जी. जी. लांडगे, जी. जी. सताळे, राखीव म्हणून एस. आर. कांबळे, एस. पी. पाटील, ए. एच. मोमीन यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
२०३ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद
तालुक्यातील तिरुका ग्रामपंचायत बिनविरोध निघाली असून उर्वरित २६ ग्रामपंचायतींच्या २०३ जागांसाठी २९ हजार ३४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष १६ हजार ९५१, तर महिला मतदार १५ हजार ४३ आहेत. निवडणूक विभागाकडून १० झोनल अधिकारी, ५५ वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली.
संवेदनशील केंद्रांवर चाेख बंदोबस्त...
मरसांगवी, अतनूर, हळद वाढवणा, वांजरवाडा, कुणकी, आदी गावांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये दोन डीवायएसपी, दोन पोलीस निरीक्षक, तीन पीएसआय, १४० पोलीस कर्मचारी व होमगार्डांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वच ठिकाणी करडी नजर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश सौंडारे यांनी दिली.