रात्रीच्या गस्तीवरील पोलीस व्हॅनला भरधाव कंटेनरची धडक; एक कर्मचारी जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: May 25, 2023 19:17 IST2023-05-25T19:17:01+5:302023-05-25T19:17:11+5:30
लातूर जिल्ह्यातील देवणी-ताेगरी मार्गावर झाला अपघात

रात्रीच्या गस्तीवरील पोलीस व्हॅनला भरधाव कंटेनरची धडक; एक कर्मचारी जखमी
लातूर : रात्रीच्या वेळी गस्तीवर निघालेल्या पाेलिस व्हॅनला भरधाव कंटेनरने पाठीमागून जाेराची धडक दिल्याची घटना २४ मे राेजी रात्री लातूर जिल्ह्यातील देवणी-ताेगरी मार्गावर घडली. या अपघातात एक पाेलिस कर्मचारी जखमी झाला असून, व्हॅनचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पाेलिस नाईक संजय माधवराव बाेयणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. देवणी पाेलिस ठाण्याच्या व्हॅनद्वारे (एम.एच. २४ ए.डब्ल्यू. ९३२१) पाेलिस कर्मचारी रात्रीच्या वेळी देवणी ते ताेगरी मार्गावर गस्त घालत हाेते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने (टी.एन. ०९ आर. ९७००) जाेराची धडक दिली. या अपघातात व्हॅनचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पाेलिस व्हॅनमधील गस्तीवर असणारे पाेलिस हेड काॅन्स्टेबल नळगीरे हे जखमी झाले आहेत. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात गुरुवारी कंटेनरचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस हवालदार उस्तुर्गे करीत आहेत.