एक हजाराची लाच घेणाऱ्या काेतवालला पाेलिस काेठडी; एसीबीची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: April 24, 2025 01:56 IST2025-04-24T01:55:41+5:302025-04-24T01:56:06+5:30
पंचासमक्ष राहुल मरे याला एक हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक हजाराची लाच घेणाऱ्या काेतवालला पाेलिस काेठडी; एसीबीची कारवाई
लातूर : निलंगा तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या आदेशाची छायांकित प्रत देण्याच्या कामासाठी एक हजाराच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना काेतवाल राहुल बालाजी मरे (वय ४३, रा. शाबीतवाडी, ता. निलंगा) याला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याला निलंगा न्यायालयात बुधवारी दुपारी हजर केले असता, तीन दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली आहे.
लातूर एसीबीचे पाेलिस उपाधीक्षक संताेष बर्गे यांनी सांगितले, अजनी (ता. शिरूर अनंतपाळ) येथील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे शिराेळ वांजरवाडा येथील वडिलाेपार्जित जमीन असून, त्याबाबत वाटणी हाेऊन ताबा मिळविण्यासाठी निलंगा येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला हाेता. न्यायालयाने तक्रारदाराच्या आईच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविराेधात तक्रारदाराच्या आईच्या भाचीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने ३ जानेवारी राेजी ती याचिका फेटाळली. तक्रारदाराने २७ मार्च राेजी निलंगा तहसीलदार यांना औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रत जाेडून शेतीचा ताबा देण्याबाबत विनंती अर्ज केला हाेता. त्यानुसार निलंगा तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या आदेशाची छायांकित प्रत देण्यासाठी राहुल बालाजी मरे याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती. याबाबत तक्रारदाराने लातूर एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर निलंगा तहसील परिसरात सापळा लावला. यावेळी पंचासमक्ष राहुल मरे याला एक हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पाेलिस अधीक्षक संदीप पालवे, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर एसीबीचे पाेलिस उपाधीक्षक संताेष बर्गे, पाेलिस निरीक्षक अन्वर मुजावर, फारुक दामटे, भागवत कठारे, भीमराव आलुरे, श्याम गिरी, संदीप जाधव, मंगेश काेंडरे, दीपक कलवले, गजानन जाधव, किरण गंभिरे, शाहजान पठाण, शिवराज गायकवाड, असलम सय्यद, संताेष क्षीरसागर यांच्या पथकाने केली.