लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गुरुवारी लातूर शहरात पेट्राेल १०८ रुपये ८४ पैसे तर डिझेलचे दर ९६ रुपये ९६ पैशांवर होते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, विमानात वापरण्यात येणाऱ्या एटीएफ पेट्रोलचा दर ६६ रुपये प्रतिलीटरवर आहे. त्यामुळे विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग झाले असून, सर्वसामान्यांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच महागाईच्या भडक्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. शासनाने इंधनाची दरवाढ कमी करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
पगार कमी, खर्चात वाढ...
कोरोनामुळे पगार कपात झाली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा कमी पगार हाती येत आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे घर चालवावे कसे, हा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही दिवसात दर कमी न झाल्यास दुचाकीवर फिरणेही अवघड होणार आहे. दरवाढीमुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची गरज आहे. - चेतन हाके
गेल्या दीड वर्षांपासून व्यवहारांवर निर्बंध आले आहेत. महिन्याला येणारा पगारही पुरेनासा झाला आहे. मुलांचे शिक्षण, शाळांची फी, किराणा, दवाखाना या गोष्टींसाठी काटकसर करावी लागत आहे. मार्केटमध्ये सद्यस्थितीत सर्वच व्यवहार डबघाईला आले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वी ६०० ते ७०० रुपयांना मिळणारा गॅस ८६० रुपयांवर पोहोचला आहे तर पेट्रोल १०८ आणि डिझेल ९६ रुपयांवर गेले आहे. शासनाने यामध्ये निर्णय घेऊन सर्वसामान्यांवर असलेेले महागाईचे ओझे कमी करण्याची गरज आहे. - सचिन निंबोळकर
कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी हजार...
कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. जिथे पूर्वी ५०० रुपये लागायचे तिथे आज हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.
शहरातून गावाकडे जायचे म्हटले तर ४ लीटर पेट्रोल लागते. सरासरी ५०० रुपयांचा खर्च लागतो. मात्र, एस. टी. बसने गेल्यास केवळ २०० रुपये लागतात. त्यामुळे काहीजणांनी गावाकडे जाण्यासाठी बसचा आधार घेतला आहे.
कोरोनामुळे अर्थकारण कोलमडल्याने सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचे चित्र आहे.