पन्नालाल सुराणा: अनाथांच्या उत्कर्षासाठी राबणारा 'बाप'माणूस काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:15 IST2025-12-04T13:14:28+5:302025-12-04T13:15:02+5:30
आम्ही पुन्हा पोरके झालो, बालकांनी मांडल्या भावना

पन्नालाल सुराणा: अनाथांच्या उत्कर्षासाठी राबणारा 'बाप'माणूस काळाच्या पडद्याआड
- पांडुरंग पोळे
नळदुर्ग : राजकारणापेक्षा समाजसेवा व आधुनिक निधर्मी समाज रचना उदयास यावी, यासाठी अहोरात्र झटणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा (भाऊ) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. या अकल्पित आघाताने त्यांच्या छायेखाली वाढलेले 'आपलं घर' दुःखाच्या सावटात असून, राष्ट्र सेवा दलाच्या साथींचे अन् इथल्या बालकांचे आसवं थांबता थांबेनात. 'बाप' माणसाच्या अशा एक्झिटने त्यांचा सबंध परिवार सुन्न झाला आहे.
१९९३ साली किल्लारी व उमरगा परिसरात प्रलयंकारी भूकंप झाला. त्यात शेकडो लोक जमिनीत गाडले गेले. त्यातून वाचलेली लहान मुले, विवाहित मुली यांची संख्या उल्लेखनीय होती. माय-बापाविना पोरक्या झालेल्या बालकांना पन्नालाल सुराणा यांच्या रूपाने नाथ मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अनाथ मुलांना आश्रय मिळावा, यासाठी नळदुर्गजवळील बालाघाट डोंगररांगांच्या माथ्यावरील पाच एकर जमीन दिली आणि त्या ठिकाणी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मोठे बालकाश्रम उभे झाले. सरकारी टेकूवर हा तंबू टिकणार नाही, याची जाणीव झालेल्या भाऊंनी त्यांनी उभ्या केलेल्या कार्यात अडसर येऊ नये यासाठी जवळपास तीन कोटी रुपयांच्या ठेवी मासिक प्राप्ती होईल, अशा प्रकारे बॅंकांत ठेवून आर्थिक तरतूद करून ठेवली. यातूनच आजवर सुमारे ३ हजारांवर विद्यार्थी येथून स्वावलंबी बनून बाहेर पडले. त्यांच्या अचानक जाण्याने आपलं घरवर मोठा आघात झाला आहे.
शेतीमातीत रमले, विद्यार्थीही घडवले
पन्नालाल भाऊंनी बांधबंदिस्ती, वृक्षारोपण, बचत, वैचारिक प्रगल्भता, समाजातील बारकावे, स्वयंरोजगार, कला, क्रीडा, राजकारण, स्पर्धा परीक्षा, शिक्षण, शेती, रोजगार आदी क्षेत्रांत अनाथ मुलं, मुली मागे पडू नये, महिलांचे राहणीमान व प्रतिष्ठा वाढावी यासाठी प्रयत्न केले. शेतीत रमताना आपल्या विद्यार्थ्यांत शेतीमातीचे संस्कारही रुजवले. विधवा पुनर्विवाह, अनाथांचे आंतरजातीय विवाह घडवून आणत त्यांनी अनेकांचे संसारही उभे केले.
बसचा प्रवास अन् टपालपेटीशी नाते
भाऊंनी अखेरच्या श्वासापर्यंत लालपरी आणि पोस्टाच्या लाल पेटीशी असलेले नाते कायम राखले. त्यांचा प्रत्येक प्रवास हा एसटीनेच ठरलेला असायचा. शिवाय, मोबाइलच्या जमान्यातही ते पोस्टकार्डचा वापर करीत राहिले. याद्वारे बस आणि टपालपेटीशी आपले नाते आजीवन टिकवून ठेवले.
आमचे वडील आम्हाला पुन्हा सोडून गेले...
संघटन कौशल्य, व्यासंगी वृत्ती, पितृत्वासोबतच मातृत्वाची भावना, चुकलं तर न रागावता त्या सुधारणा करणारे मार्गदर्शन करणाऱ्या भाऊंच्या निधनाने समाजवादी विचारवंतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
-अजित शिंदे, अध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्र सेवा दल
गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि दानशूर वृत्ती असलेले पन्नालाल भाऊ सुराणा यांचे निधन झाल्याने आम्हीं मायेला पोरके झालो आहोत.
- विलास वकील, व्यवस्थापक, आपलं घर.
या प्रकल्पात मी मागच्या वर्षी दाखल झाले. भाऊ सतत अभ्यास घेत, महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देत, समाजात कसं राहायचं, कसं बोलायचं, संयम आणि नकार कशा प्रकारे हाताळायचे याबाबत खूप मार्गदर्शन करायचे. भाऊंच्या निधनाने आम्ही पुन्हा पोरके झालो.
- शामबाला नरवटे, इयत्ता ९ वी, आपलं घर
दंगा-मस्ती करताना समजावून सांगत आणि अभ्यास करून घेत. जेवला का नाही, अशी विचारणा करणारे भाऊ आमच्यात आज नाहीत. आता मला पुन्हा माझे वडील मला सोडून पुन्हा गेले, असे वारंवार वाटते आहे.
- समर्थ स्वामी, इयत्ता ८ वी, आपलं घर