पावसाची उघडीप, बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:25+5:302021-06-26T04:15:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : तालुक्यात मृगात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात केली. परंतु, ...

The opening of the rain, Baliraja Hawaldil | पावसाची उघडीप, बळीराजा हवालदिल

पावसाची उघडीप, बळीराजा हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात मृगात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात केली. परंतु, आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने पेरणीचा वेग मंदावला आहे. आजपर्यंत केवळ साडेचार हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामुळे ८० टक्के शेतकऱ्यांना पेरणी वेळेवर होईल की नाही, याची चिंता लागली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकूण ३४ हजार ७०० हेक्टर जमीन असली तरी त्यापैकी २९ हजार ७०० हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. यंदा २८ हजार ३८४ हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित आहे. मृगाच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे यंदा खरिपाच्या पेरण्या वेळेवर होतील आणि चांगले पीक पदरी पडेल, अशी आशा बाळगून शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ केला. जवळपास ४ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे चाड्यावरील मूठ स्थिरावली आहे. दिवसभर आकाशात ढग दाटून येत आहेत, परंतु पाऊस पडत नसल्याने खरिपाच्या पेरण्या वेळेवर होतील की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

दिवसभर ढग अन् रात्री टिपूर चांदणे...

खरिपाच्या पेरण्यांचा वेग वाढेल, असे वाटत असतानाच अचानक पावसाने दडी मारल्याने पेरण्यांचा वेग मंदावला आहे. अनेक शेतकऱ्यांनी महागामोलाची खते, बियाणे वाया जाऊ नये म्हणून पेरणी थांबवली आहे. कारण दिवसभर ढग आणि रात्री टिपूर चांदणे पडत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आजपर्यंत केवळ साडेचार हजार हेक्टर्सवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामुळे २४ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत.

सोयाबीनचा सर्वाधिक पेरा...

तालुक्यात आतापर्यंत सोयाबीन ३ हजार ७२३ हेक्टर, उडीद १०४ हेक्टर, मूग ११३ हेक्टर, तूर ६६८ हेक्टर, हायब्रीड ज्वारी २५ हेक्टर, मका १० हेक्टरवर पेरा झाला असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.

Web Title: The opening of the rain, Baliraja Hawaldil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.