हमीभावासाठी 'ऑनलाईन' नोंदणी सक्तीची; अंगठ्याचे ठसे उमटेनात, शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:04 IST2025-11-08T12:03:08+5:302025-11-08T12:04:07+5:30
खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.

हमीभावासाठी 'ऑनलाईन' नोंदणी सक्तीची; अंगठ्याचे ठसे उमटेनात, शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला
लातूर : शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी उदासीन असलेल्या राज्य शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विलंब केला. त्यात शेतकऱ्यांना अंगठ्याचे ठसे नोंदणीसाठी बंधनकारक केले आहे. ३१ ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. मात्र, खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना तासनतास उभे राहावे लागत आहे. त्यातही ज्येष्ठांच्या अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीने संकटात आणले. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. उरलेसुरले काढण्यासाठी मजुरी जास्त द्यावी लागली. राशीनंतर बाजारात माल आणला तर आर्द्रतेच्या नावाखाली अक्षरश: व्यापाऱ्यांकडून लूट करण्यात आली. बाजारात ३ हजार ते ३८०० रूपये उच्चांकी भाव मिळाला. आठ दिवसांपूर्वी राज्य शासनाने हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू केली. प्रत्यक्षात खरेदी १५ नोव्हेंबरनंतर खरेदी सुरू होणार आहे.
नाेंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
हमीभाव खरेदी केंद्रावर नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने नोंदणीत अडथळा निर्माण होत आहे. जिल्ह्यात १५ खरेदी केंद्रे आहेत, त्याठिकाणी ३१ ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत ७ हजार ४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
सातबारा, आधार अन् अंगठा
खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सात बारा ही कागदपत्रे जमा करावी लागत आहेत. सोबतच सातबारावर नाव असलेल्या शेतकऱ्याचा अंगठा स्कॅन केला जात आहे. ज्यांचे अंगठे स्कॅन होत नाहीत, त्यांना परत पाठविले जात आहे. ज्येष्ठांनी नोंदणी करायची कशी, असा प्रश्न आहे.
जाचक अटी लावता कशाला
हमीभावाने साेयाबीन खरेदी करता मग जाचक अटी लावता कशाला, असा सवाल करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल म्हणाले, माल आमचा, सातबारा आमचा, आधार कार्ड आमचा, आम्ही सरकारला भीक मागत नाही, आम्ही आमचा शेतमाल विकतोय, त्याचे पैसे आम्हाला हवेत. अंगठा स्कॅन करण्याची अट तत्काळ रद्द करावी. खरेदी प्रक्रिया सुलभ करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल.
काम सोडून बसायचे का ?
हमीभाव खरेदी केंद्रावर ज्येष्ठ शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. नोंदणी प्रक्रिया संथ आहे, त्यातच अंगठ्याचे ठसे उमटेनात. सातबारा व इतर कागदपत्रे दिल्यावर ठसे घेण्याची गरजच काय? नोंदणी आणि खरेदी दोन्ही वेळा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा मुक्काम करण्याची वेळ आली आहे. शासनाने खरेदी प्रक्रिया सुलभ करावी. - अरूणदादा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना.