ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढले डोळ्यांचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:29+5:302021-01-01T04:14:29+5:30
अनेक मराठी शाळांसह इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ऑनलाईन शिकवणीसाठी स्वतंत्र ॲप विकसित केले आहेत. या माध्यमातूनच वर्ग घेतले जात आहेत. ...

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढले डोळ्यांचे आजार
अनेक मराठी शाळांसह इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ऑनलाईन शिकवणीसाठी स्वतंत्र ॲप विकसित केले आहेत. या माध्यमातूनच वर्ग घेतले जात आहेत. बराचकाळ मुलांच्या डोळ्यासमोर मोबाईल स्क्रिन राहिल्यामुळे डोकेदुखी, डोळेदुखी व झोपेची समस्या उद्भवली आहे. दिवसेंदिवस या समस्या वाढत आहेत. डोळ्याचे नंबरही वाढत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणाही येत आहे. झोप आणि खेळणे कमी झाल्याने मुलांचा चिडचिडा स्वभाव झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नववर्षात ऑफलाईन वर्ग सुरू करता येतील का, अशी विचारणा पालक वर्गातून शाळा व्यवस्थापनाकडे होऊ लागली आहे.
डोकेदुखी, डोळेदुखी आणि झोपेची समस्या उद्भवल्याने अनेक पालक रुग्णालयात येत असल्याचा दुजोरा डाॅक्टरांनीही दिला आहे. या समस्या आहेतच, मात्र दिलासादायक बाब म्हणजे नजरेची समस्या लवकर पालकांना यामुळे कळत असल्याचेही काही डाॅक्टरांनी सांगितले.
कमीत कमी वेळ मुलांकडे मोबाईल राहावा, यासाठी ऑनलाईन शिकवणी वर्गाचा कालावधी कमी करणे आवश्यक असल्याचा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे. मुलं कोणत्याही डिजिटल स्क्रिनसमोर जास्त वेळ राहू नयेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून डोळेदुखीचा तसेच डोकेदुखीचा त्रास उद्भवणार नाही. झोप लवकर येऊन मानसिक स्वास्थ्यही चांगले राहील. त्यामुळे वर्ग संपताच मुलांच्या हातातील मोबाईल ताबडतोब पालकांनी हस्तगत करावा. दुसऱ्या दिवशीच वर्ग सुरू होताना त्याच्याकडे मोबाईल दिला जावा, अशी व्यवस्था केल्यास फरक पडेल, असेही काही तज्ज्ञांनी सांगितले.
स्क्रिनपुढे कमी वेळ असावा
लहान मुलांमध्ये डोळेदुखी, डोकेदुखी तसेच झोपेच्या समस्या उद्भवल्या आहेत. १० ते २० टक्के या समस्यांचे रुग्ण रुग्णालयात येत आहेत. डिजिटल स्क्रिनपुढे मुलं कमीत कमी वेळ राहावेत. जेणेकरून या समस्या उद्भवणार नाहीत. मोबाईलमुळे झोप येत नाही. त्यामुळे या समस्या उद्भवत आहेत.
-डॉ. वर्धमान उदगीरकर, बालरोग तज्ज्ञ
डोळ्याला त्रास अन् झोपेचीही समस्या
डोळ्याला त्रास आणि झोपेची समस्या मुलांमध्ये उद्भवत आहे. शिवाय, ऑनलाईन वर्ग आणखी पचनी पडलेला नाही. मुलांच्या लक्षात येत नाही. वर्ग संपल्यानंतरही अनेक मुलं मित्रांसोबत मोबाईलवर चॅटिंग करतात. पालकांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे ऑफलाईन वर्ग सुरू होणे आवश्यक आहे.
-श्रीमंत ससाणे, पालक