गुटख्यासह एकाला पकडले; घरात केला गुटख्याचा साठा, लातुरात गुन्हा, स्थागुशाच्या पथकाची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: May 31, 2025 21:09 IST2025-05-31T21:09:12+5:302025-05-31T21:09:12+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविराेधात जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.

गुटख्यासह एकाला पकडले; घरात केला गुटख्याचा साठा, लातुरात गुन्हा, स्थागुशाच्या पथकाची कारवाई
राजकुमार जाेंधळे / लातूर : गुटख्याचा साठा करुन ठेवलेल्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी छापा मारला. यावेळी १ लाख ८ हजार २१६ रुपयांच्या मुद्देमालासह एकाला अटक करण्यात आली.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविराेधात जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गत १ मे पासून अवैध व्यवसायाविराेधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. ‘अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान -१’ लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार एक तरुण घरात गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती खबऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली.
या माहितीवरुन स्थागुशाच्या पथकाने लातुरातील इस्लामपुरात एका घरावर छापा मारला. यावेळी १ लाख ८ हजार २१६ रुपयांचा गुटखा जप्त करुन, रामेश्वर नामदेव नाईकवाडे (वय ३७, रा. बसवेश्वर चौक, कव्हा नाका, लातूर) याला अटक केली. याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, रियाज सौदागर, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, राहुल कांबळे, नितीन कठारे यांच्या पथकाने केली.