भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार; लातूर-जहीराबाद महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 21:55 IST2025-08-23T21:54:32+5:302025-08-23T21:55:00+5:30
लातूर-जहीराबाद हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या महामार्गावर अलीकडे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत

भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार; लातूर-जहीराबाद महामार्गावरील घटना
राजकुमार जाेंधळे
केळगाव (जि. लातूर) : भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जण जागी ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर-जहिराबाद महामार्गावर लांबाेटा माेड येथे शनिवारी सायंकाळी घडली. सतीश अनंत कांबळे (वय ५५) असे अपघातातील मयताचे नाव आहे.
निलंगा तालुक्यातील शिरोळ (वांजरवाड) येथील सतीश अनंत कांबळे आणि संजय दौलत कांबळे हे दोघे जण दुचाकीवरुन निलंगा येथून शिरोळ गावाकडे शनिवारी सायंकाळी येत हाेते. दरम्यान, लांबोटा माेडवरील एका हॉटेलसमोर भरधाव कारने (एम.एच. २४ बी.एल. ४१८६) विरुद्ध दिशेला येत दुचाकीला जोराने उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोघे उडून रस्त्यावर पडले. यात सतीश कांबळे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. साेबतचा अन्य एक गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ...
लातूर-जहीराबाद हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या महामार्गावर अलीकडे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. शिवाय, रस्त्याला भेगाही पडल्या असून, या भेगा चुकवण्यासाठी वाहनधारक विरुद्ध दिशेने वेगात वाहन चालविताता. यातच अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघाताची माहिती निलंगा पोलिस समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल हाेत पाहणी केली.
महामार्गाला गेले तडे; चालकांचा जीव धाेक्यात...
लातूर-जहिराबाद महामार्गाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. या तड्यामुळे दुचाकी चालकांचा जीव धाेक्यात आला आहे. दुचाकीचे टायर लहान आकाराचे असल्याने भेगात ते अडकत आहेत. शिवाय, लहान कार, दुचाकीचे टायर स्लिप होऊन फुटत आहेत. यातून भीषण अपघात हाेत आहेत. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.