मुखेडजवळ वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, १० जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:51+5:302021-06-16T04:27:51+5:30

हाळी येथील विनोद सोनकांबळे यांचा विवाह मंगळवारी कार्ला (ता. बिलोली) येथे होता. त्यामुळे वऱ्हाडी टेम्पोने जात होते. मुखेडपासून १० ...

One killed, 10 seriously injured | मुखेडजवळ वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, १० जण गंभीर जखमी

मुखेडजवळ वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, १० जण गंभीर जखमी

हाळी येथील विनोद सोनकांबळे यांचा विवाह मंगळवारी कार्ला (ता. बिलोली) येथे होता. त्यामुळे वऱ्हाडी टेम्पोने जात होते. मुखेडपासून १० किमी अंतरावरील सलगरा गावाजवळ अचानक टेम्पो उलटला. हा अपघात पाहून ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यात प्रशांत जनार्धन सूर्यवंशी (२७, रा. हाळी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातात १० जण गंभीर असून त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. प्रदीप जनार्धन कांबळे (२८) व नरसिंग श्रावण मसुरे (३५, दोघेही रा. हाळी) हे गंभीर आहेत. किरकोळ जखमींना उदगीरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

अपघातात वच्छला सोनकांबळे, पूनम सोनकांबळे, प्रजापती मोरे, अर्चना सोनकांबळे, मणकर्णा गायकवाड, शांता सोनकांबळे, लक्ष्मीबाई गायकवाड, जयश्री सोनकांबळे, निर्गुणा मसुरे, वैजयंती गायकवाड, लक्ष्मीबाई कांबळे, नर्मदा सूर्यवंशी, जिजाबाई कांबळे, अजय सूर्यवंशी, भागिरथी कांबळे, प्रेमला मसुरे, राजाबाई गायकवाड, अजय जगताप, वर्षा सोनकांबळे, रिया सोनकांबळे, पंचशीला कांबळे, चक्रपाणी सोनकांबळे, विद्यासागर सोनकांबळे, सुकण्या गायकवाड, वनिता गायकवाड, सुनीता गायकवाड, शैलेश महालिंगे, गंगूबाई सोनकांबळे, उज्ज्वला सोनकांबळे, कमलबाई जगताप हे जखमी झाले आहेत.

मुलाच्या निधनामुळे कुटुंबात माता एकटीच...

या अपघातात प्रशांत सूर्यवंशी हा मयत झाला आहे. प्रशांत हा कुटुंबात एकटाच होता. तो दोन वर्षांचा असताना त्याच्या वडिलाचे निधन झाले होते. त्यामुळे आईनेच मोलमजुरी करून माहेरी त्याचा सांभाळ केला. तो एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.

घरानंतर विवाहाचे होते नियोजन...

प्रशांतच्या आईच्या नावे घरकुल मंजूर झाले होते. त्यामुळे उसनवारी करून घराचे बांधकाम करण्यात येत आहे. शेवटच्या टप्प्यात बांधकाम आहे. यंदा घराचे काम पूर्ण झाले की त्यानंतर विवाह करण्याचे त्याचे नियोजन होते. परंतु, दुर्दैवाने प्रशांतवर काळाने घाला घातला.

विवाह सोहळा रद्द...

विवाह समारंभासाठी दोन टेम्पो, दोन कार जात होत्या. नवरदेवाचे वाहन विवाहाचे गाव २० किमी अंतरावर होते. पण, पाठीमागील गाडी उलटल्याचे समजताच नवरदेवाने आपले वाहन परत आणले. त्यामुळे विवाह झाला नाही.

Web Title: One killed, 10 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.