राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसचे ऑफलाइन प्रवेश रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 15:03 IST2023-10-21T15:03:04+5:302023-10-21T15:03:59+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन; राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा आदेश

राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसचे ऑफलाइन प्रवेश रद्द
लातूर : राज्यातील १६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयात चौथ्या फेरीनंतर शिल्लक जागांवर करण्यात आलेले ऑफलाइन प्रवेश रद्द करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिले आहेत. प्रवेश प्रक्रियेतील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन होत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
नीट परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची एमबीबीएस प्रथम वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण झाली. त्याच्या एकूण चार फेऱ्या झाल्या. तरीही खासगी २२ महाविद्यालयांपैकी १६ महाविद्यालयांमध्ये जवळपास १४१ जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे सीईटी सेलने शिल्लक जागा ऑफलाइन पद्धतीने भरण्याची मुभा त्या-त्या महाविद्यालयांना दिली. रिक्त जागांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ई-मेल करावा. ई-मेलवरील प्राप्त अर्जावरून गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावा, त्यातही प्रवेश न झाल्यास उपस्थितांना ऑफलाइन पद्धतीने प्रवेश द्यावेत, असे नियम करून ऑफलाइनची मुभा दिली गेली. परंतु, शैक्षणिक वर्ष २०२३ च्या एमबीबीएस प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन झाल्याचे नमूद करून ऑफलाइन प्रवेश रद्द ठरविण्यात आले आहेत.
१४१ विद्यार्थ्यांचा प्रश्न, त्या जागांचे काय होणार?
१४१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार आहेच. शिवाय, आता त्या शिल्लक जागांवरील प्रवेश नेमके कसे होणार, हे कोडे कायम आहे. शिल्लक जागांवरही ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देता येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.