लातूर : पशुधनावरील उपचारासाठी शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी, तसेच पैसे व वेळेची बचत व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने गोठ्यापर्यंत औषधोपचार सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील तीन तालुक्यात १९६२ या टोल फ्री क्रमांकाची सेवा उपलब्ध करून दिली आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदअंतर्गत १२२, राज्य शासनाचे ७ आणि ३ फिरते पशुवैद्यकीय पथके आहेत. जिल्ह्यात गाई, म्हशींची संख्या ५ लाख १२ हजार, शेळ्या १ लाख ४८ हजार, मेंढ्या ३५ हजार अशी संख्या आहे. आर्थिक प्रगतीसाठी शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करीत आहेत. पशुधनाच्या तुलनेत पशुचिकित्सालयाची संख्या कमी असल्याने पशुधनावरील उपचारासाठी शेतकऱ्यांची अडचण होत होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांची ही समस्या दूर व्हावी, तसेच शासकीय शुल्कात औषध उपचार सेवा मिळावी, म्हणून नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतून १९६२ या टोल फ्री क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुधनास पशुवैद्यकीय सुविधा घरपोच दिली जात आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुविधा...
१९६२ टोल फ्री क्रमांकाची सुविधा सध्या प्रायोगिक तत्त्वावर लातूर, औसा व देवणी या तीन तालुक्यात उपलब्ध करण्यात आली आहे. या क्रमांकावर फोन केल्यानंतर सर्व आरोग्य सुविधा शासकीय सेवा शुल्कात घरापर्यंत तातडीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
शेतकऱ्यांची अडचण दूर...
संबंधित तालुक्यातील पशुपालकांना पशुधनासंदर्भात समस्या असल्यास सकाळी ८ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करून घेऊ शकतात. या सेवांचे ५ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात दर्शविलेल्या तातडीनुसार विहित वेळेमध्ये सेवा पुरविल्या जातील. या सेवांमध्ये कृत्रिम रेतन, औषधोपचार, अवघड प्रसुती, विषबाधा अशा विविध प्रकारच्या सेवा आहेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन. एस. कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी सांगितले.
लवकरच जिल्हाभरात सेवा...
सध्या प्रायोगिक तत्त्वावर लातूर, औसा आणि देवणी या तीन तालुक्यात ही आरोग्य सेवा सुरू आहे. लवकरच संपूर्ण जिल्हाभरात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तीन तालुक्यात मे, जून, जुलै या कालावधीत एकूण ६४ पशुपालकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
- डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.