गुणपत्रक-प्रमाणपत्र आता एकाच कागदावर! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:12 IST2026-03-31T20:10:52+5:302026-03-31T20:12:34+5:30

विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमातही होणार बदल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता मिळणार एकत्रित गुणपत्रक, प्रमाणपत्र

Now not two, but one certificate! Board's historic decision for 10th-12th students | गुणपत्रक-प्रमाणपत्र आता एकाच कागदावर! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय

गुणपत्रक-प्रमाणपत्र आता एकाच कागदावर! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी/मार्च २०२६ च्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वेगवेगळे न मिळता, ते एकत्रित स्वरूपात देण्यात येणार आहे. लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी यासंदर्भात लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना लेखी पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.

आतापर्यंत गुणपत्रकावर नावाचा क्रम वेगळा असू शकत होता. मात्र, नवीन निर्णयानुसार एकत्रित गुणपत्रकावर विद्यार्थ्यांचे नाव ‘प्रथम नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव’ अशा विशिष्ट क्रमानेच छापले जाणार आहे. या नावाच्या क्रमात काही त्रुटी असल्यास त्या ऑनलाइन पद्धतीने तत्काळ दुरुस्त करून घेण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत.

फोटो दुरुस्तीसाठी शेवटची संधी
ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर फोटो अस्पष्ट होते आणि त्यावर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने नवीन फोटो लावण्यात आले होते, अशा विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा अपलोड करणे अनिवार्य आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर फोटो करेक्शन ही लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे.

मुख्याध्यापकांना कडक सूचना..!
मंडळाने स्पष्ट केले आहे की, फोटो किंवा नावातील दुरुस्तीची ही शेवटची संधी आहे. यानंतर कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. जर एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकीची छापली गेली किंवा फोटोमध्ये त्रुटी राहिली, तर होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जातील.

महत्त्वाचे मुद्दे :
एकत्रित दस्तऐवज : गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर मिळणार.
नावाचा नवा फॉरमॅट : नाव, वडिलांचे नाव, आडनाव असा असेल क्रम.
अंतिम मुदत : फोटो दुरुस्तीसाठी पोर्टलवरील लिंकचा वापर तातडीने करणे आवश्यक.

कागदपत्रांची संख्या कमी होणार..!
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची संख्या कमी होऊन ती जतन करणे सोपे होणार आहे. लातूर विभागातील तिन्ही जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावरून सर्व शाळा-महाविद्यालयांना या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title : मार्कशीट और प्रमाणपत्र संयुक्त! छात्रों के लिए बोर्ड का ऐतिहासिक निर्णय।

Web Summary : महाराष्ट्र बोर्ड 2026 से 10वीं और 12वीं के लिए संयुक्त मार्कशीट और प्रमाणपत्र जारी करेगा। नाम प्रारूप मानकीकृत है। फोटो सुधार तुरंत करें; त्रुटियों के लिए स्कूल जिम्मेदार हैं।

Web Title : Marksheet and certificate combined! Board's historic decision for students.

Web Summary : Maharashtra board will issue combined mark sheets and certificates from 2026 for 10th and 12th. Name format is standardized. Photo corrections must be done promptly; schools are responsible for errors.