मराठा आरक्षणासाठी आता ठाेक माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:13+5:302021-06-23T04:14:13+5:30

मराठा आरक्षण आणि भविष्यातील आंदाेलनाबाबत केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी ...

Now for the Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी आता ठाेक माेर्चा

मराठा आरक्षणासाठी आता ठाेक माेर्चा

मराठा आरक्षण आणि भविष्यातील आंदाेलनाबाबत केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी समाजाची फसवणूक केली आहे. समाजाच्या नावावर खासदारकी, आमदारकी आणि महामंडळाचे अध्यक्षपद घेतले. आरक्षणासाठी राज्यात आतापर्यंत शांततेच्या मार्गाने मूक माेर्चे काढण्यात आली. मात्र, समाजाला अद्यापही आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. आता आम्हाला मूक माेर्चा मान्य नाही. येणाऱ्या काळात आता मूक नाही तर ठाेक माेर्चा काढूनच आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मिळवून घेऊ, यासाठी येत्या १ जुलैपासून महाराष्ट्रभर दाैरा केला जाणार आहे. आरक्षण आणि आंदाेलनाबाबत ठाेस दिशा ठरवली जाणार आहे़. आम्हाला ओबीसीमधून टक्केवारी वाढवून आरक्षण देण्यात यावे, यासाठी आता आमची आर या पारची लढाई करण्याची तयारी आहे. काेणीही येताेय समाज आणि आरक्षणाच्या नावावर राजकीय पाेळ्या भाजून घेत आहे, आता हे चालणार नाही. भविष्यात आरक्षणासाठी, समाजासाठी वाट्टेल ती किंमत माेजण्याची आमची तयारी आहे, असेही नानासाहेब जावळे म्हणाले.

यावेळी कार्याध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे-पाटील, प्रदेश महासचिव मनाेज माेरे, प्रदेश सल्लागार भगवान माकणे, प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, मराठा महासंग्रामचे राजकुमार सूर्यवंशी, सुधाकर पाटील, गाेविंद मुळे, जगदीश जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

खासदार संभाजीराजेंच्या भूमिकेला विराेध

खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला छावा संघटनेचा विराेध आहे. ते आरक्षणाची भूमिकाच बाजूला ठेवत सरकारशी बाेलत आहेत. आरक्षण हीच मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे. इतर मागण्या गाैण आहेत. यासाठी आता आम्ही रस्त्यावर उतरणार असून, हे आंदाेलन अधिक तीव्र करणार आहाेत, असेही नानासाहेब जावळे म्हणाले.

Web Title: Now for the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.