आता अन्नदाता करणार क्षयरुग्णांचे पोषण! लातूर जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम

By हरी मोकाशे | Updated: March 2, 2024 17:02 IST2024-03-02T16:55:28+5:302024-03-02T17:02:04+5:30

क्षयरुग्णांना औषधींबरोबरचे देणार प्रथिनेयुक्त आहार

Now food donors will feed tuberculosis patients! A new initiative of Latur Zilla Parishad | आता अन्नदाता करणार क्षयरुग्णांचे पोषण! लातूर जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम

आता अन्नदाता करणार क्षयरुग्णांचे पोषण! लातूर जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम

लातूर : क्षयराेगावर मात करण्यासाठी रुग्णांना औषधींबरोबर सकस आणि प्रथिनेयुक्त आहार महत्त्वाचा असतो. शासनाकडून मोफत औषधी मिळतात. मात्र, आर्थिक अडचणींमुळे पोषक आहार मिळत नाही. परिणामी, घेतलेली औषधी पचत नाहीत. त्यातून रुग्ण आणखीन गळाटतो. दरम्यान, गरजू रुग्णांना पोषण आहार मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने अन्नदाता उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्याच टप्प्यात २०० अन्नदाता मदतीसाठी पुढे आले आहेत.

क्षयरुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत गोळ्या- औषधी दिल्या जातात. तसेच त्यांना पुरेसा, सकस आणि प्रथिनेयुक्त आहार मिळणे आवश्यक असते. जिल्ह्यात सध्या १ हजार ९१० क्षयरुग उपचारावर आहेत. त्यापैकी एक हजारपेक्षा जास्त रुग्णांना सकस आहार मिळत नसल्याने त्यांनी पोषण किट देण्याची मागणी जिल्हा आरोग्य विभागाकडे केली आहे.

क्षयरुग्णांना प्रथिनेयुक्त आहार मिळावा म्हणून शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाने निक्षय मित्र धोरण अवलंबिले. मात्र, त्यास अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने अन्नदाता उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत २४ मार्चपर्यंत प्रत्येक रुग्णांना किमान तीन महिने पुरेल इतके धान्य (किट) उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

किटमध्ये काय असावे?...
एक महिन्याच्या किटमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी यापैकी एक- ३ किलो, कोणतीही दाळ - १.५ किलो, खाद्यतेल- एक पॉकेट आणि शेंगदाणे- १ किलो असणे गरजेचे आहे.

पहिल्या टप्प्यात २०० निक्षय मित्र...
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीतून अन्नदाता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे एका दिवसात जवळपास २०० जणांनी निक्षय मित्र होत पोषण आहारासाठी अन्नदाता होणार असल्याची नोंदणी केली आहे.

सामाजिक भावनेतून मदत करावी...
जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अन्नदाता उपक्रमात समाजातील दानशूर, नागरिकांनी सामाजिक भावनेतून सहभागी होऊन धान्यरुपी मदत करावी. या उपक्रमासाठी रक्कम देऊ नये. त्याऐवजी धान्य द्यावे. तसेच अन्नदाता कोण आहे, याची माहिती आहे. प्रत्येक निक्षय मित्रास केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाते.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

समाजातीन नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे...
क्षयरुग्णांना औषधीबरोबर प्रथिनेयुक्त आहार मिळाल्यास तो लवकर बरा होऊन सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतो. त्यासाठी अन्नदाता उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील सेवाभावी संस्था, नागरिकांनी धान्य किट देण्यासाठी पुढे यावे.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Now food donors will feed tuberculosis patients! A new initiative of Latur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.