वाद सामोपचाराने सोडविण्यासाठी आता ई-लोकअदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:16+5:302021-07-20T04:15:16+5:30
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी न्यायालयात प्रविष्ठ तसेच अन्य वाद प्रकरणे सामोपचाराने सोडविण्यासाठी दि. १ ऑगस्ट रोजी ई ...

वाद सामोपचाराने सोडविण्यासाठी आता ई-लोकअदालत
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी न्यायालयात प्रविष्ठ तसेच अन्य वाद प्रकरणे सामोपचाराने सोडविण्यासाठी दि. १ ऑगस्ट रोजी ई - लोकअदालत होणार आहे. पहिल्यांदाच ई - लोकअदालत होणार असल्याची माहिती लातूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायमूर्ती एस. डी. अवसेकर यांनी सोमवारी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे ई - लोकअदालत होत असल्याचे सांगून न्यायमूर्ती अवसेकर म्हणाल्या, लोकअदालतीत सामोपचाराने प्रकरणे सोडविण्यासाठी दि. २२ ते ३१ जुलै या कालावधीत प्री कौन्सिलिंग होणार आहे. लोकअदालतीसाठी ज्यांना येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ई - लोकअदालत आहे. यात प्रत्यक्ष उपस्थित राहूनही आपली प्रकरणे आपसात समझोत्याने सोडवता येतील. न्यायालयात प्रविष्ठ, बँक, विमा, भू-संपादन अशी विविध प्रकारची प्रकरणे दाखल करता येणार आहेत. लोकअदालतीमुळे वाद सामोपचाराने संपुष्टात येत असल्याने मानसिक तणाव कमी होण्याबरोबरच वेळेचीही बचत होते.
लोकअदालतीमुळे लवकर न्याय मिळतो. तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कायदेशीर सल्ला देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. त्यासाठी विविध शिबिरे घेतली जातात. आता शासनाच्या योजनांच्या माध्यमातून कायद्याची ऑनलाईन माहिती देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असेही न्यायमूर्ती अवसेकर यांनी सांगितले.