टोकाचे पाऊल उचलू नका; ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी एकजुटीने संघर्ष करू: छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:16 IST2025-09-13T13:16:29+5:302025-09-13T13:16:55+5:30
जीवन संपविलेल्या भरत कराड कुटुंबीयांचे सांत्वन करत भुजबळ म्हणाले, "तो ओबीसी समाजाचा पहिला शहीद."

टोकाचे पाऊल उचलू नका; ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी एकजुटीने संघर्ष करू: छगन भुजबळ
रेणापूर (जि. लातूर) : जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत तुम्ही असले आत्महत्येचे मार्ग अवलंबू नका. राज्यात ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने संघर्ष करू, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी येथे सांगितले. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण दिल्याने आता ओबीसी आरक्षण संपणार या भीतीपोटी बुधवारी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शुक्रवारी गावात आले होते.
यावेळी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, लातूर ग्रामीणचे आ. रमेश कराड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे, ॲड. सुभाष राऊत, विजय गंभीरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ग्रामस्थांच्या उपस्थितीत भरत कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी समाजबांधवांनी लढा उभारून स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीने आरक्षण मिळवले, त्याचप्रमाणे आता हे आरक्षण टिकवण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आमच्यासोबत लढावे, संघर्ष करावे, मात्र कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या कुटुंबाला रस्त्यावर सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आरक्षणावर गदा येऊ देणार नाही
जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ओबीसी आरक्षणावर गदा येऊ देणार नाही. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे. त्यांना आरक्षण मिळाले आहे. त्यांना आणखीन मिळो. परंतु ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण मिळू देणार नाही. आमच्या ३५४ छोट्या-छोट्या जातीच्या, अठरापगड जातीच्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही. हा ओबीसी समाजाचा पहिला शहीद आहे, यापुढे कोणीही असे टोकाचे पाऊल उचलणार नाही. कराड कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्थानिकचे लोकही घेतील व आम्हीही घेऊ, अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
कोणीही आततायीपणा करू नये
माजी मंत्री आ. मुंडे म्हणाले, सरकार सजग आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका होणार नाही, याची काळजी घेतली आहे. कोणीही आततायीपणा करू नये. या प्रकरणात सरकारच्या वतीने जी मदत करायची ती जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यात सर्व अठरापगड जाती एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतील, यासाठी प्रयत्न करावेत.
मुलांच्या शिक्षणाची आ. कराड यांनी घेतली जबाबदारी
मयत भरत महादेव कराड यांना तीन मुली व एक मुलगा आहे. कराड हे ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या मुलांची व कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी आपण घेत आहोत. त्यांना कसल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही लातूर ग्रामीणचे आ. रमेश कराड यांनी दिली.