ना मास्क, ना साेशल डिस्टन्सिंग, प्रवाशांचा विनामास्क प्रवास..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:23+5:302021-06-24T04:15:23+5:30
राजकुमार जाेंधळे / लातूर : जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर ‘लालपरी’ सध्याला सुसाट धावत असली तरी प्रवाशांचा ‘प्रवास’ मात्र विनामास्कच सुरु ...

ना मास्क, ना साेशल डिस्टन्सिंग, प्रवाशांचा विनामास्क प्रवास..!
राजकुमार जाेंधळे / लातूर : जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर ‘लालपरी’ सध्याला सुसाट धावत असली तरी प्रवाशांचा ‘प्रवास’ मात्र विनामास्कच सुरु असल्याचे बुधवारी समाेर आले आहे. लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकातून मार्गस्थ झालेल्या नांदेड, अहमदपूर, उदगीर, निलंगा बसमध्ये ५० टक्क्यांहून जास्त प्रवाशांनी मास्कचा वापर केला नसल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातून जिल्ह्यातील प्रमुख मार्गांसह लांबपल्ल्याच्या मार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. ही वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. काही बसेसमध्ये तर चालक आणि वाहकांनीच मास्क लावला नसल्याचे दिसून आले. विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, लालपरीबराेबरच विनामास्क प्रवासीही बिनधास्त प्रवास करत आहेत.
एक तासाच्या प्रवासात कितीवेळ ताेंडावर मास्क
लातूर ते शिरुर ताजबंद हा जवळपास एक तासाचा प्रवास आहे. या प्रवासात आष्टामाेड, लातूर राेड, चाकूर, चापाेली आणि शिरुर ताजबंद असे थांबे आहेत. या थांब्यांवर अनेक प्रवाशांची चढ-उतार झाली. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवाशांकडे मास्कच नसल्याचे दिसून आले. मास्क वापरण्याबाबत वाहकही आग्रही नसल्याचे दिसून आले तर चालक आणि वाहकांचाही मास्क एक तासाच्या प्रवासात अनेकदा निघाला. केवळ बिनधास्तपणे वावरणे आणि काेराेना नियमांचे पालन न करणे, हेच चित्र यातून दिसून आले.
‘लाेकमत’चा एस. टी. प्रवास...
लातूर बसस्थानक
लातूर बसस्थानकातून लातूर - उदगीर ही बस बुधवारी संध्याकाळी ५ वाजता मार्गस्थ झाली. या बसमध्ये जवळपास ३० प्रवासी प्रवासी बसले हाेते. ही बस पुढे उदगीरच्या दिशेने मार्गस्थ झाली. विवेकानंद चाैकात प्रवासी बसमध्ये चढले. यातील काही प्रवासी आष्टामाेड येथे उतरले.
आष्टामाेड
लातूर येथून उदगीरच्या दिशेने मार्गस्थ झालेली बस आष्टामाेड येथे थांबली. येथे पाच प्रवासी उतरले आणि तीन नवे प्रवासी बसमध्ये चढले. यातील काही प्रवाशांच्या ताेंडाला मास्क नसल्याचे दिसून आले.
नळेगाव
आष्टामाेड येथून आष्टा आणि पुढे नळेगाव येथील बसस्थानकात ही बस आली. या बसस्थानकावर ८ प्रवासी उतरले आणि नवीन ५ प्रवाशांनी बसमध्ये प्रवेश केला. यातील तिघांच्या ताेंडाला मास्कच दिसला नाही. यातून प्रवासी बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून आले.
येराेळमाेड
नळेगाव येथून उदगीरच्या दिशेने ही बस मार्गस्थ झाली. घरणीमाेड, चांबरगा पाटी आणि येराेळमाेड या मार्गावर काही प्रवाशांची चढ-उतार झाली. येराेळमाेड येथे बस आल्यानंतर उदगीरला जाण्यासाठी काही प्रवाशांनी बसमध्ये प्रवेश केला तर येराेळमाेड येथे चार प्रवासी उतरले.
उदगीर बसस्थानक
लातूर येथून उदगीर येथे आलेल्या बसने जवळपास दाेन तासांनी उदगीरच्या बसस्थानकात प्रवेश केला. दरम्यान, वाटेत आष्टामाेड, नळेगाव, येराेळमाेड, लाेहारा येथे प्रवाशांची चढ-उतार झाली. यातील बहुतांश प्रवाशांच्या ताेंडाला मास्क नसल्याचे दिसून आले.