निलंग्यात उन्हाळी सोयाबीनचे नवे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:01+5:302021-03-20T04:18:01+5:30
निलंगा : गत पावसाळ्यात अतिपाऊस तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीन ...

निलंग्यात उन्हाळी सोयाबीनचे नवे प्रात्यक्षिक
निलंगा : गत पावसाळ्यात अतिपाऊस तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृषी विभाग बिजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीनचे प्रात्यक्षिक घेत असून, सध्या तीन एकरावरील हे सोयाबीन बहरले आहे. त्यामुळे शेतक-यांत कुतूहल निर्माण झाले आहे.
आगामी खरीप हंगामात बिजोत्पादनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड व कृषी सहायक सुनील घारूळे यांनी उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन नवीन प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच तालुक्यातील नणंद येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप कुलकर्णी यांनी ३ एकरात उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
उन्हाळी सोयाबीनची पेरणी साधारणतः डिसेंबरअखेरीस ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात केली जाते.
नणंद येथील प्रदीप कुलकर्णी यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड करून योग्य नियोजन केल्यामुळे सध्या हे पीक चांगले बहरले असून, फुलधारणेच्या अवस्थेत आहे. त्यामुळे कुतूहलाचा विषय ठरला आहे. हे सोयाबीन पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत आहेत. एप्रिलमधील वाढत्या तापमानात सोयाबीनचे किती उत्पन्न पदरी पडते, याची प्रतीक्षा असल्याचे शेतकरी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
तालुक्यात प्रथमच प्रयोग...
निलंगा तालुक्यात २० वर्षांपूर्वी ३०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होत होता. त्यानंतर मुख्य पिकाशी स्पर्धा करीत आता सोयाबीनचे क्षेत्र ६९ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. शेतक-यांना दरवर्षी लागणाऱ्या बियाणांपैकी ४० टक्के बियाणे शेतकरी बाजारातून खरेदी करतात. खरेदीचे प्रमाण कमी करून शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे म्हणून उन्हाळी सोयाबीन लागवडीचे प्रयोग मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कृषी सहाय्यकांच्या कार्यक्षेत्रात प्रथमच घेत आहेत. त्यातून तालुक्यात किमान ३०० क्विंटल बियाणे मिळणार आहे. यातील अडचणींचा अभ्यास केला जाईल. या नव्या प्रात्यक्षिकामुळे आगामी काळात शेतकरी किमान बीजोत्पादनासाठी तरी उन्हाळी सोयाबीन घेतील.
- रणजित राठोड, मंडल कृषी अधिकारी.
तालुक्यात ५४ एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन पेरा झाला आहे. त्यातून शेतकऱ्यांना बियाणे बदल व बीजोत्पादनाकरिता उन्हाळी लागवडीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. बाजारातील बियाणांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे. घरचे दर्जेदार बियाणे तयार करून ते पुढील हंगामासाठी वापरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- राजेंद्र काळे, तालुका कृषी अधिकारी.