खून केल्यानंतर दगड बांधून मृतदेह कॅनलमध्ये फेकला; दोन दिवसांनंतर पटली ओळख
By राजकुमार जोंधळे | Updated: October 11, 2022 19:02 IST2022-10-11T19:01:56+5:302022-10-11T19:02:54+5:30
बाभळगाव शिवारातील कॅनलच्या पाण्यात एका ४८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना साेमवारी रात्री उशिरा समाेर आली.

खून केल्यानंतर दगड बांधून मृतदेह कॅनलमध्ये फेकला; दोन दिवसांनंतर पटली ओळख
लातूर : एकाचा खून करून, कमरेला दगड बांधून मृतदेह कॅनलमध्ये फेकून दिल्याची घटना साेमवारी रात्री उशिरा समाेर आली. ही घटना लातूर तालुक्यातील बाभळगाव शिवारात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दाेन दिवसांनंतर लातूर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिसांना मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले आहे. अरविंद नरसिंग पिटले (वय ४८, रा. बालाजीवाडी-वलांडी ता. देवणी) असे मयताचे नाव आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, बाभळगाव शिवारातील कॅनलच्या पाण्यात एका ४८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना साेमवारी रात्री उशिरा समाेर आली. दरम्यान, याबाबतची माहिती पाेलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या व्यक्तीवर कशाने तरी वार करून त्याचा पहिल्यांदा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या कमरेला लाल रंगाची पिशवी बांधून त्यात दगड व पांढऱ्या रंगाच्या कपड्याने हात-पाय बांधून मृतदेह कॅनलमध्ये फेकण्यात आला. कमरेला दगड बांधल्याने मृतदेह पाण्यावर येणार नाही, असा मारेकऱ्यांचा अंदाज हाेता. मात्र, ताे चुकीचा ठरला. हा खून काेणत्या कारणासाठी करण्यात आला? याचा तपास पाेलीस करत आहेत. मंगळवारी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले असून, देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील अरविंद पिटले यांचा असल्याचे समाेर आले आहे. घटनास्थळाला स्थानिक गुन्हे शाखा आणि लातूर ग्रामीण ठाण्याच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात उत्तम देवके यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस निरीक्षक गणेश कदम करत आहेत.
दाेन दिवसांपूर्वी झाला खून...
बाभळगाव शिवारातील कॅनलमध्ये आढळून आलेल्या व्यक्तीचा खून हा दाेन दिवसांपूर्वी मारेकऱ्यांनी केल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांनंतर हा कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर आल्याने खुनाचे बिंग फुटले आहे, असे पाेलीस निरीक्षक गणेश कदम म्हणाले.