नागलगाव शिवारात माय-लेकिने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 17:54 IST2022-01-22T17:53:09+5:302022-01-22T17:54:13+5:30
माय-लेकीचा मृतदेह नागलगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

नागलगाव शिवारात माय-लेकिने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील नागलगाव नजीक असलेल्या काशिराम तांडा येथील माय-लेकिने लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली असून, घटनेचे कारण समाेर आले नाही.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील नागलगाव नजीक काशिराम तांडा आहे. या तांड्यावर वास्तव्याला असलेल्या संगिता गंगाराम चव्हाण (३५) आणि अंजली गंगाराम चव्हाण (१३) या माय-लेकीचा मृतदेह नागलगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत शनिवारी सकाळी आढळून आला.
याबाबत वैजनाथ तुकाराम राठोड यांनी दिलेल्या माहितीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांनी भेट देत घटनेची पाहणी केली. या घटनेचे नेमके कारण मात्र अद्याप समाेर आले नाही. पाेलीस त्या दिशेने तपास करत आहे, असे सूत्रांनी सांगितले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ करीत आहेत.